छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा इतिहास आहे. संपूर्ण देशाला अभिमान वाटावा, असे महाराजांचे कार्य आहे. या कार्याची आठवण ठेवण्याबरोबरच त्यांच्या कार्यातून प्रत्येकाने प्रेरणा घेणे आवश्यक आहे. महाराजांचा भव्य पुतळा शहरात असावा, अशी अनेक वर्षांंपासून शहरावासीयांची इच्छा होती. येत्या वर्षभरात अश्वारूढ पुतळा उभा राहणार असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. 

नाटय़गृह परिसरात पुतळा उभारणीच्या कामाचे शिवजयंतीच्या मुहुर्तावर भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगर परिषद अध्यक्ष सुभाष राय, प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, जिल्हाधिकारी राहुलरंजन महिवाल, न.प. उपाध्यक्ष मनीष दुबे, मुख्याधिकारी रवींद्र पांढरे उपस्थित होते. सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच अश्वारूढ पुतळा बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे राजे होते. गोरगरीब जनता व अठरापगड जातीच्या कल्याणासाठी महाराजांनी काम केले. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा महाराजांनी सुरू केली. त्यांच्या कार्याची आठवण या पुतळ्यापासून होणार आहे, असे सांगून पालकमंत्री म्हणाले, पुढील जयंतीदिनानिमित्त पुतळा पूर्ण होणार आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार मदन येरावार यांनी यावेळी, शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा समाजाला प्रेरणा व महाराजांच्या कार्याची आठवण करून देईल, असे प्रतिपादन केले. खासदार भावना गवळी यांनी, प्रत्येकाने छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेतली पाहिजे, असे सांगितले. न. प. अध्यक्ष सुभाष राय यांचे अध्यक्षीय भाषण झाले. माजी खासदार सदाशिवराव ठाकरे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्याधिकारी रवींद्र पांढरे यांनी केले. यावर्षीच्या नप अर्थसंकल्पात पुतळ्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमास न.प. सभापती प्रणिता खडसे, नंदा जिरापूरे, रेखा कोठेकर यांच्यासह अनेक नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आभार नगर परिषद अभियंता रावसाहेब पालकर यांनी मानले.