शेतीकर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली असून दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ केले जाणार असल्याची घोषणा महसूल तथा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी केली. त्याचबरोबर शेतीपंपाची वीज न तोडण्याचे आदेशही त्यांनी महावितरणला दिले.
येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात रविवारी परभणी व िहगोली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा खडसे यांनी घेतला. यावेळी परभणीचे खा. संजय जाधव, िहगोलीचे खा. राजीव सातव, माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, आमदार बबनराव लोणीकर, विजय भांबळे, डॉ. राहुल पाटील, डॉ. मधुसूदन केंद्रे, डॉ.संतोष टारफे, तानाजी मुटकुळे, बाबाजानी दुर्राणी, रामराव वडकुते, कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलु, जिल्हाधिकारी एस. पी. सिंह, िहगोलीचे जिल्हाध्यक्ष राम गगराणी यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांतील अधिकारी आणि सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
खडसे म्हणाले, पारंपरिक आणेवारीची पद्धत बदलण्यासाठी शासनाचा प्रयत्न सुरू आहे. उपग्रहाच्या माध्यमातून आणेवारी काढण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. राज्यात दुष्काळाची तीव्रता सर्वाधिक मराठवाडय़ात आहे. त्यामुळे या भागातील जमीन महसुलात शेतकऱ्यांना सूट देण्यात येणार आहे. तसेच शेतीकर्जाची वसुली थांबवली असल्याची माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांच्या पाल्याचे अकरावी-बारावीचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय खडसे यांनी जाहीर केला.
 दुष्काळी भागातून नागरिकांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर ही गंभीर बाब आहे. मागेल त्याला काम देण्यासाठी नरेगा आणि मनरेगा या योजनांचे निकष बदलून मजुरांना गावातच काम उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तत्काळ स्थलांतरित गावांचे सर्वेक्षण करून शासनाला अहवाल देण्याची सूचना यावेळी खडसे यांनी केली. वरच्या धरणातील पाणी जायकवाडीमध्ये सोडण्यासाठी पुढील आठवडय़ात मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा आणि नगर, नाशिक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बठक बोलावली आहे. या बठकीत योग्य तो निर्णय घेऊन मराठवाडय़ाच्या हक्काचे पाणी सोडले जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली. शेतकऱ्यांना किमान सहा ते आठ तास वीज मिळाली पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडीत करू नये, अशीही सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिली. सामूहिक पाणीपुरवठय़ाच्या योजनांमधील कर नागरिकांनी भरला पाहिजे. दुष्काळावर मात करण्यासाठी केवळ शासनाला जबाबदार न धरता प्रत्येकानेच दुष्काळ निवारण्यासाठी हातभार लावावा, असेही आवाहन त्यांनी केले.
यावेळी खा. जाधव यांनी जायकवाडीच्या पाण्याचा प्रश्न उचलून धरला. परभणी शहरातील रेंगाळलेल्या पाणीपुरवठा योजनेबाबत प्रश्न उपस्थित करून धार रस्त्यावरील कत्तलखाना हटविण्याची मागणी त्यांनी केली. खा. सातव यांनीदेखील िहगोली जिल्ह्यातील सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी कयाधू नदीवर बंधारे बांधण्याची मागणी केली. तर आ. डॉ. पाटील यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत देऊन चारा छावण्या सुरू करण्याची सूचना मांडली. जिंतूर तालुक्यातील नागरिकांच्या स्थलांतराचा प्रश्न भांबळे यांनी मांडला. तालुक्यातून १० हजार लोकांचे स्थलांतर झाल्याची माहितीही त्यांनी दिली. या बठकीला पाथरीचे आमदार मोहन फड यांची अनुपस्थिती होती.