करोनाविरुद्ध सरू असलेल्या लढय़ात कार्यरत डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवक तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण निर्जंतुकीकरण करणारे १० कक्ष खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी उपलब्ध करुन दिले आहेत. सर्वोपचार रुग्णालयात दोन आणि विविध पोलीस ठाण्यांमध्ये हे कक्ष बसविण्यात आले आहेत.

खासदार भामरे यांनी भाजपच्या माध्यमातून मातोश्री गोजरताई भामरे यांच्या स्मरणार्थ हे निर्जंतुकीकरण कक्ष उपलब्ध करुन दिले आहेत. गुरुवारी हिरे वैद्यकीय महाविद्यलयाच्या सर्वोपचार रुग्णालयात दोन कक्षांचे लोकार्पण डॉ. भामरे, राजवर्धन कदमबांडे, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, महापौर चंद्रकांत सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे, अधिक्षक डॉ.राजकुमार सूर्यवंशी, डॉ. दीपक शेजवळ, डॉ.निर्मलकुमार रवंदळे, विविध विभागाचे प्रमुख आदी उपस्थित होते.

सर्वोपचार रुग्णालयात उत्तर महाराष्ट्रातील एकमेव करोना चाचणी प्रयोगशाळाही आहे. या प्रयोगशाळेत धुळे, नंदुरबार, जळगांव, नाशिक जिल्ह्यातील करोना संशयित रुग्णांच्या स्त्रावाची तपासणी केली जात आहे. यामुळे हिरे वैद्यकीय महाविद्यालय तसेच सर्वोपचार रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे खासदार भामरे यांनी स्वखर्चाने अत्याधुनिक निर्जंतुकीकरण कक्ष तयार करुन घेतले आहेत. हे दोन कक्ष रुग्णालय आवारात  कार्यान्वित करण्यात आले आहेत.

तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आठ कक्ष तयार केले आहेत. शहरातील आझादनगर, मोहाडी, शहर पोलीस ठाणे, शहर वाहतूक शाखा, देवपूर पश्चिम, तालुका ठाणे आणि उपअधिक्षक कार्यालय येथे हे कक्ष बसविण्यात आले आहेत.