21 January 2021

News Flash

पश्चिम विदर्भात पीक कर्जासाठी अद्याप प्रतीक्षा

रब्बी हंगामामध्येही शेतकरी त्रस्त, खरिपातील कर्ज उद्दिष्टपूर्ती दूरच

(संग्रहित छायाचित्र)

प्रबोध देशपांडे

पश्चिम वऱ्हाडामध्ये दरवर्षीप्रमाणे या वर्षीही खरीप हंगामात पीक कर्जवाटपाची उद्दिष्टपूर्ती झाली नाही. आता रब्बी हंगामामध्येही पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना संघर्षच करावा लागत आहे. अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित असल्याने त्यांना खासगी सावकारांचे उंबरठे झिजवण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.

खरीप व रब्बी हंगामासाठी राज्यात दरवर्षी जिल्हानिहाय पीक कर्जवाटपाचे नियोजन करण्यात येते. कर्जवाटपाचे उद्दिष्टेही ठरवण्यात येतात. मात्र, प्रत्येक जिल्हय़ात उद्दिष्टय़ांपेक्षा कमीच कर्जवाटप केले जाते. विविध कारणे पुढे करून शेतकऱ्यांना कर्जासाठी अपात्र ठरवण्यात येते. या वर्षी करोना व टाळेबंदीचा मोठा फटका कृषी क्षेत्राला बसला. दरवर्षी १ एप्रिलपासून सुरू होणारे पीक कर्जाचे वाटप या वर्षी २६ एप्रिलपासून सुरू करण्यात आले ते ३० सप्टेंबपर्यंत सुरू होते. पीक कर्जासाठी बँकांकडून कागदपत्रांसह विविध कारणांवरून शेतकऱ्यांची सातत्याने अडवणूक होते. कर्जासाठी बँकांच्या दारात जाऊनही अनेक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडते. परिणामी, बँकांचेही पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही. १ ऑक्टोबरपासून रब्बी हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून दिले जात असून ३१ डिसेंबपर्यंत त्याचे वाटप होणार आहे. या वर्षी चांगला पाऊस झाल्याने बळीराजाला रब्बी हंगामाकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. खरीप हंगामातील पिकांवर किडींचे संकट असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यातच रब्बी हंगामासाठी पैशांची जुळवाजुळव करण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे. रब्बी हंगामातील पीक कर्जासाठीही बँका शेतकऱ्यांना दाद देत नसल्याचे चित्र आहे.

अकोला जिल्हय़ात खरीप हंगामासाठी १ लाख ४२ हजार ५०० शेतकऱ्यांसाठी ११४० कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १ लाख ०६ हजार ४३४ शेतकऱ्यांना ८४६.१० कोटींचे कर्ज वितरित करण्यात आले. कर्जवाटपासाठी शेतकऱ्यांच्या निश्चित केलेल्या संख्येच्या ७५ टक्के शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले. कर्जवाटप उद्दिष्ट रकमेच्या ७४ टक्के कर्जवाटप झाले आहे.

रब्बी हंगामामध्ये अकोला जिल्हय़ातील ७ हजार ५०० शेतकऱ्यांसाठी ६० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठरवण्यात आले. २५ नोव्हेंबपर्यंत ३ हजार ०९ शेतकऱ्यांना २८.१९ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. उद्दिष्टाच्या ४७ टक्के कर्जवाटप करण्यात आले आहे. अकोला जिल्हय़ात खरीप हंगामामध्ये पीक कर्जवाटपाची कामगिरी समाधानकारक राहिली. आता रब्बी हंगामात उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणखी ५३ टक्के कर्जवाटप करण्याचे आव्हान आहे.

बुलढाणा जिल्हय़ात खरीप हंगामात ३ लाख ६२ हजार ८२८ शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यासाठी २४६० कोटींचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १ लाख ५३ हजार ९५५ शेतकऱ्यांना १२६० कोटींचे कर्ज देण्यात आले. वाटपासाठी ठरवल्यापैकी ४२ टक्के शेतकऱ्यांना उद्दिष्ट रकमेच्या ५१.२१ टक्केच कर्जवाटप झाले आहे. बुलढाणा जिल्हय़ात पीक कर्जासाठी पात्र शेतकऱ्यांची संख्या उद्दिष्टाच्या निम्म्याहून कमी होती. आता रब्बी हंगामासाठी बुलढाणा जिल्हय़ातील ४० हजार ३१४ शेतकऱ्यांसाठी पीक कर्जवाटपाचे २७३.३७ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले. आतापर्यंत २१ हजार ३६५ शेतकऱ्यांना १७२ कोटींचे कर्ज देण्यात आले. ६३ टक्के कर्जवाटप झाले आहे.

वाशीम जिल्हय़ात खरीप हंगामात पीक कर्जवाटपाचे १६०० कोटींचे उद्दिष्ट होते. मात्र, त्या ठिकाणीही उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. रब्बी हंगामामध्येही तीच परिस्थिती कायम आहे. सत्ताधारी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही बँका पीक कर्जवाटपात ताठर भूमिका घेत असल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

प्रमाणीकरणाअभावी अडचण..  

महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला. त्यांची कर्ज खाते निरंक करून त्यांना पीक कर्ज देण्याचा योजनेचा मुख्य उद्देश आहे. योजनेच्या प्रक्रियेदरम्यान करोनाचे संकट उद्भवल्याने अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्याचे प्रमाणीकरण झाले नव्हते. त्यामुळे योजनेत पात्र असूनही कर्ज खात्यावर रक्कम दिसत असल्याने अनेक शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहिले आहेत.

मंत्र्यांनी फटकारूनही बदल नाही

* खरीप हंगामातील पीक कर्जवाटपातील सुमार कामगिरी लक्षात घेऊन कृषिमंत्री दादाजी भुसे व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रशासन व बँकांना फटकारले होते.

* सहकारमंत्र्यांनी खरीप हंगामात सरासरी ५१ टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्जवाटप करणाऱ्या राज्यातील १२ जिल्हय़ांची बैठक घेतली होती.

* त्यामध्ये पश्चिम वऱ्हाडातील बुलढाणा आणि वाशीम जिल्हय़ाचा समावेश होता. मंत्र्यांनी कारवाई करण्याचेही आदेश दिले होते. मात्र, तरीही परिस्थितीत फारसा बदल झाला नाही.

पीक कर्जवाटपासंदर्भात बँकांचे कायम उदासीन धोरण असते. पीक कर्ज देण्यात टाळाटाळ करण्यात येते. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पैशांची अधिक गरज असते. त्या दृष्टीने शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्यायला हवे.

– कृष्णा अंधारे, शेतकरी जागर मंच, अकोला

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 12:17 am

Web Title: still waiting for crop loan in west vidarbha abn 97
Next Stories
1 दुसऱ्या, तिसऱ्या पसंतीच्या मतालाही मोल
2 ‘अनुकंपा’तील दोषी मोकाटच
3 पालघर विभागात ५२ सौर कृषी पंप कार्यान्वित
Just Now!
X