औरंगाबाद : काँग्रेसबरोबर बोलण्याची अजूनही इच्छा आहे, मात्र जी काही बोलणी सुरू आहेत त्यास काँग्रेसच्या वरिष्ठांची परवानगी आहे की नाही, याचा खुलासा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण यांनी करावा, असे बहुजन वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी म्हटले. ओबीसी हक्क परिषदेनंतर ते पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेसबरोबर बोलणी सुरू असल्याचेही सांगितले.

येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये इतर मागास प्रवर्गातील छोटय़ा समूहातील ५० व्यक्तींना विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी देणार असल्याचे जाहीर भाषणात सांगत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता कसे आरक्षण द्यावे याचे सूत्रही सांगितले. विशेष इतर प्रवर्गातून मराठा समाजाला देण्यात आलेले आरक्षणाचा स्वतंत्र गट असावा व मूळ मंडल आयोगाने शिफारस केल्याप्रमाणे इतर मागास प्रवर्गातील जातीसाठी गट क्रमांक एक असे संबोधण्यात यावे, तशी तरतूद केली तरच आरक्षणाचा लाभ होऊ शकेल, असे ते म्हणाले. सध्या देण्यात आलेले आरक्षण टिकेल का, याविषयी मराठा समाजाच्या नेत्यांमध्येही संभ्रम आहे. मात्र, ते बोलत नाहीत, असेही आंबेडकर म्हणाले. बहुजनांचे हक्क डावलण्यासाठीच धर्माचे राजकारण पुढे केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

बहुजन वंचित आघाडीच्या वतीने काँग्रेसबरोबर बोलणी सुरू असल्याचे मान्य करीत यापुढेही बोलणी सुरूच राहील, असे सांगत त्यांनी काँग्रेस नेत्यांनी बोलणीपूर्वी वरिष्ठांची परवानगी घेतली आहे का, या बाबत खुलासा करण्याची अट टाकली. बहुजन वंचित आघाडी आणि एमआयएम यांच्यातील युती मजबूत असल्याचे सांगत काँग्रेसच्या या अनुषंगाने असणाऱ्या आक्षेपाबाबत बोलताना ते म्हणाले, ‘अण्वस्त्र कराराच्या वेळी एमआयएमची मदत घेतली नव्हती का, याचा खुलासा काँग्रेसने करावा.’ राफेल खरेदी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर स्वतंत्रपणे बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.