27 February 2021

News Flash

शेतकाम करताना मडक्यात सापडला प्राचीन नाण्यांचा साठा

ही राष्ट्रीय संपत्ती असल्याने शासनाकडे सुपूर्द करण्याचा शेतकऱ्याचा निर्णय

शेतकाम करत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला तब्बल ७१६ पुरातन नाणी आढळली. ही माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी नाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. शेतकरी विनायक पाटील या शेतकऱ्याने ही राष्ट्रीय संपत्ती असल्याने शासनाकडे सुपूर्द करणार असल्याचे सांगितले आहे.

येथील विनायक पाटील यांची शाहुवाडी तालुक्यातील अनुस्कुरा गावात शेतजमीन आहे. मागील आठवड्यापासून ते शेतात काजू लागवड करण्यासाठी तेथे मुक्कामाला आहेत. शेतात मशागत करत असताना त्यांना मडके फुटल्याचा आवाज आल्याने ते सावध झाले. यानंतर त्यांनी कुतुहलापोटी जमिनीत असलेले मडके वर काढले. तेव्हा त्यांना मडक्या  मोठ्या प्रमाणात पुरातन नाणी आढळून आली. हा प्राचीन खजिना हाती लागल्यावर त्यांनी मोजदाद केली असता, एकूण ७१७ नाणी भरली. त्यांनी गावातील पोलीस पाटील मनोहर पाटील यांना याबाबत माहिती दिली. तसेच, ही राष्ट्रीय संपत्ती असल्याने शासनाला देणार असल्याचेही सांगितले.

तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांनी पंचनामा करून ही नाणी ताब्यात घेतली आहेत. विनायक पाटील यांच्याकडील हा प्राचीन खजिना पाहून नागरिक चकित झाले. ही नाणी नेमक्या कोणत्या काळातील आहेत, यावर लवकरच पुरातत्व विभागाकडून प्रकाश पडेल, असे सांगण्यात आले.

उपकोषागार अधिकाऱ्यांकडे सुरक्षा कक्षामध्ये ही नाणी ठेवली असून पुरातत्व विभागाच्या सहायक संचालकांशी याबाबत पत्र व्यवहार केला आहे, अशी माहिती शाहूवाडीचे तहसीलदार गुरु बिराजदार यांनी दिली. शेतकरी पाटील यांनी त्वरित जिल्हाधिकारी कार्यालय गाठून त्यांना सापडलेल्या गुप्तधनाबाबत माहिती दिली.

गुप्तधन सापडलेल्या ठिकाणाची पाहणी करुन पंचनामा केला व नाणी ताब्यात घेण्यात आली.सापडलेले गुप्तधन व मातीचे तुटलेले तुकडे याची मोजमाप करण्यात आली. त्यामध्ये अंदाजे 2 सें.मी. व्यासाची व 2 मि.मी. जाड अशी एकूण 716 नाणी आणि मडक्याचे 19 तुकडे असल्याचे दिसून आले. हे गुप्तधन लोखंडी पेटीमध्ये सीलबंद करण्यात आले आहे. सापडलेले मडके व नाणी यांचे आयुष्यमान व कालावधी कार्बन डेटींगच्या माध्यमातून काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2020 5:34 pm

Web Title: stocks of ancient coins found in pot while farming msr 87
Next Stories
1 लॉकडाउन वाढवण्याच्या निर्णयाआधीच बच्चू कडूंनी अकोल्यात संचारबंदी केली जाहीर
2 कोल्हापूर : ३०५ स्वयं-सहाय्यता समुहांकडून साडेपाच लाख ‘मास्क’ निर्मिती
3 उस्मानाबाद : करोना कक्षातील संशयित रुग्णाचा स्वच्छतागृहात आढळला मृतदेह
Just Now!
X