जुन्या नाशिकच्या नानावली परिसरात शुक्रवारी सायंकाळी दोन गटात झालेल्या वादाची परिणती तुफान दगडफेकीत झाली. त्यात अनेक वाहनांचे नुकसान झाले. दगडफेकीत वृद्ध महिला जखमी झाली. पतंग उडविण्यावरून हा वाद झाल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी तातडीने धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. भद्रकालीतील नानावली हा अतिशय संवेदनशील परिसर आहे. दोन भिन्न समाज या ठिकाणी वास्तव्यास आहेत. मकर संक्रांतीनिमित्त दोन समाजातील गट शिवाजी चौकालगतच्या वेगवेगळ्या इमारतीवरून पतंग उडवीत होते. गच्चीवर डीजे लावण्यात आला होता. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास पतंग उडविण्यावरून वेगवेगळ्या गच्चीवर असणाऱ्या युवकांच्या गटात काही वाद झाले. यामुळे दोन्ही गटातील युवकांनी संत नामदेव महाराज सभागृहासमोर येऊन परस्परांवर दगडफेक सुरू केली.

अचानक झालेल्या या घटनेमुळे रहिवाशांची पळापळ झाली. घराखाली लावलेल्या वाहनांची नासधूस केली गेली. दगडफेकीत एक महिला जखमी झाली. या घटनेची माहिती समजल्यानंतर भद्रकाली पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिघ्र कृती दलास पाचारण करण्यात आले. जखमी महिलेला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. नुकसानग्रस्त वाहने पोलीस ठाण्यात नेण्यात आली. स्थानिकांना शांततेचे आवाहन करत पोलिसांनी दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले. याआधी या भागात दोन समाजात वाद होऊन त्याचे रूपांतर दंगलीत झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी पोलीस चौकी करावी, अशी मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केली.

गच्चीवरून पडून मुलगा जखमी

मकर संक्रांतीच्या दिवशी पतंगोत्सवाचा आनंद घेत असताना दुमजली घरावरून पडून १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. नवीन सिडकोतील हनुमान चौक येथे ही घटना घडली. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पतंग उडविण्यासाठी हनुमान चौकात वास्तव्यास असणारा आकाश अर्जुन वाकोडे दुमजली घरावरील गच्चीवर गेला. पतंग उडविण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि तो खाली पडल्याचे सांगितले जाते. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. आसपासचे नागरिक व कुटुंबीयांनी त्याला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.