शिर्डी येथील भिकाऱ्यांच्या हत्यासत्रातील खुनी सापडला असून संशयित म्हणून अटक केलेल्या तरूणानेच सहा भिकाऱ्यांचे खून केले असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे रेल्वेस्थानकावर काही भिकाऱ्यांनी त्याला लुटले होते. त्या रागातून त्याने शिर्डीत सहा भिकाऱ्यांचे खून केल्याचे उघडकीस आले आहे.  
या खुन्याचे नाव सचिन रामदास वैष्णव (वय ३०, रा. माळीवाडा, खुलताबाद रोड, औरंगाबाद) असे आहे.  शिर्डी पोलिसांनी तीन दिवसांपूर्वी या संशयितास ताब्यात घेऊन नंतर अटक केली होती. त्यावेळी त्याने सतीश रामदास अलकोल (वय २८, रा. नगरसूल, तालुका येवला) असे खोटे नाव व पत्ता सांगितला होता. पंरतु तपासात सत्य बाहेर आले. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने सुरूवातीला खोटे नाव सांगितले होते. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.   
गुन्ह्य़ांची कबुली!
पहिल्या दोन खुनांनंतर पोलिसांनी याच संशयिताला ताब्यात घेऊन रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मात्र रेल्वे पोलिसांनी त्याला सोडून दिले होते. पुढे त्याने आणखी ४ भिकाऱ्यांचे खून केले. सीसी टीव्ही फुटेजवरून पोलिसांनी आरोपी सचिन याला पुन्हा अटक केली. त्यानंतर सचिन वैष्णव याच्याविषयीच्या पूर्ण नोंदी व खरे नाव -पत्ता तपासात उघड झाला. सहा भिकाऱ्यांचे खून व दोघांना गंभीर जखमी केल्याची कबुलीही त्याने पोलिसांना दिली. आरोपी वैष्णव याने आणखी काही गुन्हे केलेले आहेत का याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
प्रकरण काय? शिर्डीत  २८ जुलै रोजी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन भिकाऱ्यांच्या डोक्यात दगड टाकून त्यांची हत्या करण्यात आली होती. २७ जुलै रोजी एक अशा चार भिकाऱ्यांची हत्या करण्यात आली होती.  तत्पूर्वी ८ जुलै रोजी शिर्डी रेल्वेस्थानकावर दोन भिकाऱ्यांची हत्या करण्यात आली होती. दोन भिकारी त्याच्या खुनी हल्यातून बचावले होते. भिकाऱ्यांच्या या हत्यासत्राने शिर्डीच नव्हे तर राज्यात खळबळ उडाली होती.