ठिबक सिंचन योजनेत भ्रष्टाचार होतो आहे. हा भ्रष्टाचार तातडीने थांबला पाहिजे. केंद्रीय कृषी राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात ही टीका केली. ठिबक सिंचन कंपन्या सबसिडी घेतात, मात्र स्वतः ‘लक्ष्मीदर्शन’ करून शेतकऱ्यांचे नुकसान करतात. शेतकऱ्यांच्या हाती अनुदान पोहचेपर्यंत काहीही शिल्लक राहत नाही. ठिबक सिंचन योजनेसाठी सरकारकडून अनुदान दिले जाते. मात्र ठिबक सिंचन करणाऱ्या कंपन्या १० रूपयांची वस्तू २० रुपयांना विकतात यामुळे शेतकरी नाहक भरडले जातात. हे सगळे प्रकार तातडीने थांबले पाहिजेत असेही गडकरी यांनी सुनावले. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलचे आयोजन नागपुरात करण्यात आले आहे. या कार्यक्रमावेळी नितीन गडकरी बोलत होते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठिबक सिंचनासंदर्भातली योजना बँकेशी जोडली गेली की शेतकऱ्यांना चांगले पैसेही मिळतील आणि गैरव्यवहारही नियंत्रणात येतील असा सल्लाही गडकरींनी दिला. याच कार्यक्रमात नागपुरातील ऑरेंज फेस्टिव्हलसाठी राज्याचा पर्यटन विभाग मदत करेल अशीही घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नागपुरातला वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हल हा तीन दिवस चालणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्यभरातले शेतकरी या ठिकाणी आले आहेत. एवढेच नाही तर संत्रे विषयातील देश विदेशातील तज्ज्ञ, उत्पादकही या महोत्सवात सहभागी होणार आहे. संत्रा उत्पादकांना समृद्धीचा नवा मार्ग दाखवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stop corruption in irrigation schemes says nitin gadkari
First published on: 16-12-2017 at 21:08 IST