राज्य सरकार व राज्य साखर संघ मागण्या मान्य करण्यास चालढकल करीत असल्याचा आरोप करून २० जानेवारीपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा ‘सीटू’ प्रणीत महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटनेने दिला.
संघटनेचे राज्य सरचिटणीस सुभाष जाधव यांनी सोमवारी येथे पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. राज्यातील सुमारे १० लाख ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या वेतनावाढीचा नवीन करार १५ दिवसात करण्याचे आश्वासन गेल्या २० नोव्हेंबरला मुंबईतील त्रिपक्षीय बैठकीत सहकारमंत्री व राज्य साखर संघाच्या अध्यक्षांनी दिले होते. परंतु त्याबाबत प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने कामगारांची फसवणूक झाली आहे. दर ३ वर्षांनी करण्यात येणाऱ्या या आधीच्या त्रिपक्षीय कराराची मुदत २०१३-१४ च्या गळीत हंगामात संपली.
ऊसतोडणी व वाहतूक कामगारांना सध्या मिळणारे दर कमी आहेत. ऊसतोडणी कामगारास प्रतिटन ३५० रुपये द्यावेत, बैलगाडीद्वारे करण्यात येणाऱ्या वाहतूक दरात दुप्पट वाढ करावी. मुकादमाचे कमिशन २२ टक्के करावे. प्रत्येक कामगाराचा तीन लाख रुपयांचा विमा काढून त्याचा हप्ता राज्य सरकार व साखर कारखान्यांनी भरावा आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत. जाधव म्हणाले की, राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांमधील पदाधिकारी तिसऱ्या पिढीतील आहेत. तसेच ऊसतोडणी व वाहतूक कामगारांचीही तिसरी पिढी आता कामावर आहे. ऊसतोडणी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा स्वागतार्ह आहे. अनेक वर्षांपासून आमची ही मागणी होती. त्यासाठी निधी उभारणीसंदर्भात काही सूचना पूर्वीपासून केल्या जात आहेत. साखर उत्पादनावर एक टक्का उपकर लावण्याची सूचनाही महामंडळाच्या अनुषंगाने करण्यात आली आहे, असेही जाधव म्हणाले.