हर्षद कशाळकर

वादळाने रायगड जिल्ह्य़ात साडेसहा हजार हेक्टर क्षेत्रावरील बागायतींचे नुकसान झाले आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यासह माणगाव, रोहा, तळा, म्हसळा, सुधागड, पेण, कर्जत आणि खालापूर तालुक्यांना फटका बसला.  वादळामुळे गावेच्या गावे उद्ध्वस्त झाली.

सुपारी, नारळ, आंबा आणि काजू झाडे वादळात उन्मळून पडली आहेत. त्या उभ्या करण्यासाठी आठ ते दहा वर्षांचा कालावधी लागणार आहे. श्रीवर्धन, मुरुड आणि अलिबाग तालुक्यातील मच्छीमार बोटींचेही नुकसान झाले आहे. मत्स्यशेतीचेही नुकसान झाले आहे. विजेचे खांब उन्मळून पडल्याने १५ पैकी १२ तालुक्यांतील वीजपुरवठा बाधित झाला. बहुतांश भाग अंधारात आहे.

बँक व्यवहारांवरही परिणाम

दूरसंचार आणि इंटरनेट व्यवस्थाही खंडित आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटीअभावी बँकांचे व्यवहार बंद आहेत. त्यामुळे बँकेतून अथवा एटीएममधून पैसे काढणेही शक्य नाही. जिल्ह्य़ात वादळामुळे दीड लाखांहून अधिक घरांची छपरे उडाली आहे.

शाळा, अंगणवाडय़ांनाही फटका

वादळात जिल्ह्य़ातील ७९९ शाळा आणि अंगणवाडय़ांचे मोठे नुकसान झाले आहे. या शाळांची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अन्यथा शाळा लवकर सुरू करणे अवघड जाणार आहे.

वादळामुळे खायचे काय आणि राहायचे कुठे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. घराची दुरुस्ती करायलाही पैसे शिल्लक नाही.

– शीतल साळवी, रहिवाशी हरिहरेश्वर

वादळानंतर श्रीवर्धनला जोडणारे सर्वच रस्ते झाडे उन्मळून पडल्याने बंद होते. आता  रस्ते वाहतूक सुरू झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून लागेल ती मदत केली जाईल.    – भरत शितोळे, अप्पर जिल्हाधिकारी, रायगड