पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दुपारी उरण येथील जेएनपीटी बंदरातील चौथ्या नवीन बंदराच्या शिलान्यासाच्या कार्यक्रमाला येत आहेत. परंतू पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यावर वादळाचे सावट आहे. हवामान खात्याने याची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

प्रादेशिक हवामान विभागाने शनिवारी पुर्व अरबी समुद्रामध्ये (गोवा राज्यापासून नैऋत्यपासून ४१० किलोमीटर व मुंबईपासून नैऋत्य पासून ६३० किलोमीटर) कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तो पट्टा पुढील २४ तासांमध्ये उत्तरेकडे सरकण्याचा इशारा दिला आहे. यामुळे पश्चिम किनारपट्टीला वादळ व अतिवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पंतप्रधान हे उरण येथील बंदरावर रविवारी कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याने प्रशासनाला चिंता आहे. उरण येथे मोदींच्या सुरक्षेची जबाबदारी नवी मुंबई पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्याकडे आहे. आयुक्तांसह पाच पोलीस उपायुक्त, पाच सहाय्यक पोलीस आयुक्त, ३० पोलीस निरीक्षक, ७९ सहायक पोलीस निरीक्षक, ५३८ कर्मचारी व ६१ महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह इतर असा आठशे पोलिसांचा फौजफाटा या बंदोबस्तासाठी आहे.