वैरीण झाली नदी..

दिगंबर शिंदे, सांगली</strong>

नातवंड म्हणजे दुधावरची साय, पण या महापुरात दूध आणि साय म्हणजे आजी आणि नात बोट उलटून येरळा नदीच्या प्रवाहात बेपत्ता झाल्या. जीवाभावाची येरळा त्यांची वैरीण झाली. या माउलीने मृत्यूच्या दाढेतही नातीला छातीशी कवटाळले. अखेरच्या प्रवासातही आजी आणि नात प्रवाहात दिसेनाशा झाल्या. या दृश्याने पाहणाऱ्यांचे काळीज फाटले.. कृष्णाकाठ हळहळतो आहे.. तर येरळाकाठ नि:शब्द झाला आहे.

पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे पूरग्रस्तांना नेणारी बोट उलटली. या दुर्घटनेत ९ जण बुडाले तर एक आजी दीड वर्षांच्या चिमुकलीला छातीशी धरून येरळेच्या प्रवाहात दिसेनाशी झाली. यामुळे केवळ गावातच नव्हे, तर अख्ख्या जिल्ह्य़ात हळहळ आहे.

ब्रह्मनाळ जवळ कृष्णेला बिलगण्यासाठी विटा-खानापूरच्या घाटमाथ्यावरून धावत येणारी येरळा, तशी अवखळ आणि उथळही. यामुळे पाण्याला नैसर्गिक ओढ. या नदीचे पात्र ओलांडून सुरक्षित स्थळी जाण्याचा प्रयत्न काल ब्रह्मनाळ येथील लोक करीत असताना क्षमतेपेक्षा जादा लोक बसल्याने आणि महापुरात वाहून आलेला अडथळा लागल्याने बोट उलटली आणि ९ जण बुडाले.

या दुर्घटनेत पियु सागर वडेर ही दीड वर्षांची बोलकी बाहुली जग पाहण्यापूर्वीच पुरात बेपत्ता झाली. कस्तुरी बाळासाहेब वडेर (४५) या दीड वर्षांच्या नातीला घेऊन वसगडेला निघाल्या होत्या. बोट उलटली आणि आजीसोबत पियुही येरळेच्या धारेला लागली. जीवाच्या आकांताने ओरडूनही मदत मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. कारण बोटीत असलेले सर्वच जण धारेला लागलेले. जे येरळेच्या अंगाखांद्यावर खेळत होते, कृष्णेच्या डोहात ज्यांनी पोहण्याचे वस्तुपाठ गिरवले ते पोहत काठावर आले. मात्र ज्या बाया-बापड्या धुणी धुत असताना आपली सुख-दुख येरळेच्या कृष्णेच्या पाणवठय़ावर सांगत होत्या, तीच जीवाभावाची येरळा, कृष्णामाई त्यांची वैरीण झाली. या माउलीने तरीही दुधावरच्या सायीची साथ सोडली नाही. मृत्यूच्या दाढेतही माउलीने नातीला छातीशी कवटाळले.

काल दुर्घटनेतील बेपत्ता झालेल्यांचा शुक्रवार संध्याकाळपर्यंत शोध लागला नव्हता. अन्य पूरग्रस्तांना वाचविण्यात यंत्रणा गुंतली असल्याने शोध मोहीमेवरही मर्यादा आली होती. बेपत्तांचे काय झाले असेल, हा एकच प्रश्न खटाव आणि ब्रह्मनाळमधील ग्रामस्थांच्या डोळ्यांत महापूर आणत होता.