23 January 2021

News Flash

होतकरूंसाठी ‘ते’ ठरले खाकी वर्दीतील देवदूत

तळागाळातून घडवले शेकडो प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी

प्रबोध देशपांडे, लोकसत्ता
अकोला : एखाद्या सकारात्मक कार्यातून कसा अनेकांच्या आयुष्याचा कायापालट होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पोलीस अधिकारी महिपालसिंग चांदा यांचा उपक्रम. तळागाळातील होतकरू तरुण-तरुणींना गेत अनेक वर्षात त्यांनी मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्याचे कार्य अविरत केले. त्यातून महाराष्ट्र पोलीस, सैन्यदल व इतर विविध विभागात शेकडो प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी घडले आहेत. गोंदिया येथून पोलीस उपअधीक्षक पदावरून आज, ३० जूनला निवृत्त झालेले महिपालसिंग चांदा यांनी ग्रामीण भागातील तरुणांच्या हितासाठी हे कार्य अधिक व्यापक करण्याचा मानस व्यक्त केला.

सध्याच्या काळात बहुतांश तरुणांसाठी शासकीय नोकरी दुरापास्त. त्यातच ग्रामीण भागात शिक्षण, प्रशिक्षण व मार्गदर्शनाचा अभाव. क्षमता असूनही काही प्रमाणात ग्रामीण भागातील होतकरू तरुण मागे पडतात. गावगाड्यातील शेकडो तरुणांना महिपालसिंग चांदांनी प्रशिक्षण व मार्गदर्शनातून सक्षम करून त्यांना प्रशासकीय सेवेच्या वाटेवर आणाले. चांदा यांच्या तालमीत असंख्य तरुणांचे आयुष्य घडले. आज ते विविध विभागात आपली सेवा प्रदान करीत आहेत. बुलढाणा जिल्हा व तालुक्यातील १० हजार लोकवस्ती असलेल्या चांडोल गावातील मूळचे महिपालसिंग चांदा यांनी आपल्या नोकरीच्या काळात पोलीस उपनिरीक्षक ते उपअधीक्षक पदापर्यंतचा प्रवास पूर्ण केला. लहान गावातून पुढे आलेल्या चांदा यांना ग्रामीण भागातील तरुणांच्या शिक्षण, नोकरी संदर्भातील समस्या, अडचणी याची जाणीव होती. वडील नथ्थूसिंग सरपंच राहिले असल्याने शेती, राजकारण व समाजकारणात जुळले होते. आई रुख्मणबाई गृहिणी. त्यांच्या घरातच पाच वर्ष मोफत शाळा चालल्याने सामाजिक कार्याचे बाळकडू घरातूनच मिळाले. दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच झाल्यावर पुढील एम.एस्सी.पर्यंतचे शिक्षण अमरावती, औरंगाबाद व राहुरी विद्याापीठात झाले. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्यावर नाशिक येथे प्रशिक्षण घेऊन अमरावती जिल्ह्यात रुजू झाले. पोलीस दलातील धकाधकीच्या नोकरीत गडचिरोली, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, जळगाव, नागपूर, उमरखेड, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यात सेवा देता आली.

गरजू तरुणांसाठी काही तरी करण्याची धडपड व महत्त्वाकांक्षा महिपालसिंग चांदांना स्वस्थ बसू देत नव्हती. अधिकारी झाल्याने गावकरी व नातेवाईकांनी त्यांच्या मुलांना लावून घेण्याची इच्छा अनेकदा बोलून दाखवली. त्यामुळे प्रशिक्षण देऊन होतकरूंना नोकरीसाठी तयार करण्याचा निर्धार त्यांनी केला. जळगावला असताना गावाकडची काही गरीब तरुण-तरुणींना पोलीस भरतीच्या तयारीसाठी आणले. स्वत:च्या खर्चात एक मोठे घर भाड्याने घेऊन त्यांची सर्व व्यवस्था केली. त्या तरुणांकडून शारीरिक-बौद्धिक तयारी करून घेतली. त्यातील अनेक मुली आज पोलीस दलात मुंबई, जळगाव, नाशिकला नोकरीला आहेत. यवतमाळ जिल्ल्यात बाभूळगावातही हाच उपक्रम राबवून अनेकांच्या जीवनातला कलाटणी दिली. २०१० च्या अखेरीस चंद्रपूर जिल्ल्यात सिंदेवाही या नक्षलग्रस्त भागात पोलीस निरीक्षक म्हणून ते बदलून आले. या अवघड ठिकाणीही त्यांनी उपक्रमाच्या माध्यमातून अनेक दुर्लक्षितांना मुख्य प्रवाहात आणले. पोलीस ठाण्याच्या सभागृहात व पोलीस वसाहतीत तरुणांची राहण्याची सोय केली जात होती.

या भागात कुपोषणाचे मोठे प्रमाण असल्याने शारीरिक चाचणीत ते अडचणीचे ठरत होते. तरुणांच्या पौष्टिक खाण्यापिण्यावरही त्यांनी विशेष लक्ष दिले. यामध्ये त्यांच्या पत्नीसह त्यांना अनेकांची साथ मिळाली. परिणामी, नक्षलग्रस्त भागातूनही अनेक जण प्रशासकीय सेवेत दाखल झाले. उमरखेड येथे पोलीस निरीक्षक असतांना त्यांनी ईगल चमूची स्थापना करून अनेक मुलांना स्पर्धा परीक्षेचे दालन उघडे करून दिले. २०१६ मध्ये पोलीस भरती, एमपीएससी, सैन्यदल, वनविभाग, महावितरण, एसआरपीएफ, जेल आदींसह अनेक विभागात २५ पेक्षा जास्त जणांची निवड झाली. यवतमाळलाही त्यांनी असेच भरीव कार्य राबवले. निसर्ग व पशुपक्ष्यांविषयी कमाचीची आस्था असल्याने महिपालसिंग चांदांनी कचऱ्याचं साम्राज्य असलेल्या श्रीकृष्ण नगरात नागरिकांच्या मदतीने बाग फुलवली. २०१८ मध्ये गोंदियाला बढतीवर उपअधीक्षक म्हणून बदलून आले. निवृत्तीनंतरच्या जीवनात गावात मुलांना एमपीएससी-युपीएससी परीक्षांसाठी सक्षम करणार आहे. त्यासाठी वसतिगृह, ग्रंथालय काढून मोठे मैदान तयार करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

नक्षलग्रस्त भागातून ८२ तरुण पोलीस दलात
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही सारख्या नक्षलग्रस्त भागात उपक्रम राबविण्याचे मोठे आव्हान महिपालसिंग चांदा यांच्यापुढे होते. त्यांनी अनेक गावात फिरून पालकांच्या भेटीगाठी घेत विश्वाास संपादन केला. दहावी पास झालेली मोजकेचे तरुण भेटत होते. त्यांना प्रशिक्षण दिल्याने सिंदेवाहीतल्या सव्वातीन वर्षाच्या कार्यकाळात ८२ तरुण-तरुणी पोलीस दलात नोकरीला लागले.
ते आमचे, ‘आदर्श आणि दीपस्तंभ’
या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमातून शेकडो गरीब मुलामुलींचे आयुष्य बदलून गेले. अनेक जण उच्च पदांवर पोहचले. कधीही गावाबाहेर न पडलेले तरुण आज विविध विभागांमध्ये जनसेवा करीत आहेत. महिपालसिंग चांदा हे आमच्यासाठी प्रेरणास्थान, आदर्श आणि दीपस्तंभच असल्याची भावना नोकरीवर लागलेल्या अनेकांनी व्यक्त केली.

“गावखेड्यातली तरुण कुठेतरी गावातच खितपत राहण्यापेक्षा शासकीय सेवेच्या मुख्य प्रवाहात आलेला बघतांना ऊर भरून येतो. या कार्यात बरीच माणसं मदतीला धावून आली. पत्नीची साथ तर मोलाचीच होती. भविष्यातही गावामध्ये हे कार्य अविरत सुरूच ठेवायचे आहे.”
– महिपालसिंग चांदा, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक, गोंदिया.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 12:15 pm

Web Title: story of police officer who is hope for youth in gondia scj 81
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘रिंगण’च्या संत सोपानदेव विशेषांकाचं प्रकाशन
2 गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणतात…
3 डॉक्टर्स डे स्पेशल : आधी करोनाबाधितांची सेवा, मग कौटुंबिक जबाबदारी
Just Now!
X