चहा टपरीचालक शिवसैनिकाची व्यथा

जिल्ह्यात शिवसेनेची पहिली शाखा सुरू करणारे दत्तात्रय वऱ्हाडे. उतरत्या वयात चरितार्थासाठी त्यांची सुरू असलेली धडपड ‘लोकसत्ता’ने प्रकाशझोतात आणली. ‘वृध्द शिवसैनिकाला चहा टपरीचाच आधार’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित झाले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेत असलेल्या सेनेच्या नेत्यांना वऱ्हाडे यांची दखल घ्यावी वाटली नाही. अखेर एका कार्यकर्त्यांचे दुख दूर करण्यासाठी मुंबईतील तरुण कार्यकत्रे धावून आले. दररोज दोन लिटर रॉकेलसाठी धडपड करणाऱ्या वऱ्हाडे यांना या तरुण शिवसनिकांनी गॅस सिलिंडर, शेगडी आणि चहा टपरीसाठी नवीन पत्रे देऊन जिल्ह्यातील शिवसेनेच्या मातब्बर नेतेमंडळींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.   जिल्ह्य़ात धनुष्यबाण १९८९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच मतदारांसमोर आले. तोवर धनुष्यबाणाची ओळखसुद्धा नव्हती. त्यापूर्वी सात वष्रे अगोदर १९८२ साली काही तरुणांनी बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणांनी प्रभावित होऊन जिल्ह्यात सेनेची पहिली शाखा सुरू केली. ना जिल्हाप्रमुख, ना तालुकाप्रमुख मात्र सेनेचा पहिला फलक झळकला. दत्तात्रय नारायण वऱ्हाडे चहाची टपरी चालविणारा तरुण पहिला शाखाप्रमुख झाला. शाखा सुरू करण्यासाठी खिशातील २५ रुपये वऱ्हाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खर्च केले होते, तेही चक्क हॉटेल बंद ठेवून.

मागच्या ३५ वर्षांत जिल्ह्यातील राजकारणात आमूलाग्र बदल झाले आहेत. उस्मानाबादमधील सामान्य शिवसनिकांनी १९८९ च्या निवडणुकीनंतर शिवाजी कांबळे,कल्पना नरहिरे,प्रा. रवींद्र गायकवाड हे तीन खासदार आणि रवींद्र गायकवाड, ज्ञानेश्वर पाटील, दयानंद गायकवाड, ज्ञानराज चौगुले आणि ओम राजेनिंबाळकर हे सहा आमदार आजवर निवडून दिले. मात्र पहिल्या शाखाप्रमुखाला चरितार्थासाठी चहा टपरीचाच आधार घ्यावा लागला. २४ नोव्हेंबरच्या अंकात ‘लोकसत्ता’ ने जिल्ह्यातील पहिल्या शाखाप्रमुखाची कैफियत ठळकपणे मांडली. तेव्हा पालिका निवडणुकीचा ज्वर शिगेला पोहोचला होता.

हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ‘श्वास माझा शिवसेना’ या समाजमाध्यमाच्या ग्रुपवरील तरुणांनी वऱ्हाडे यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. या ग्रुपमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातील तरुण सहभागी आहेत. अखेर त्यांनी उस्मानाबाद गाठले. त्यातील अनेकजण या पहिल्या शाखाप्रमुखाला भेटण्यासाठी उत्सुक होते. गॅस शेगडी, सिलिंडर, पत्रे, बांबू असे सुमारे २५ हजारांचे साहित्य विकत घेऊन चहा टपरीच्या आधारे उतरत्या वयातही शिवसेनेचे काम करणाऱ्या या शाखाप्रमुखाला तरुण कार्यकर्त्यांनी मदतीचा हात दिला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेची फळे चाखणाऱ्या जिल्ह्यातील मातब्बर नेतेमंडळींचे मात्र वऱ्हाडे यांच्या टपरीकडे कधीच पाऊल वळले नव्हते. या ग्रुपच्या माध्यमातून मंगेश मिस्कीन, अतीश पाटोळे, विशाल बामणे, सुनील मडवी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी, नेतेमंडळींनी दुर्लक्ष केले तरी कार्यकर्त्यांच्या मदतीला कार्यकत्रे धावून येतातच याचे उदाहरण या निमित्ताने घालून दिले आहे.

शिवसैनिक हाच सर्वात मोठा सन्मान : वऱ्हाडे

शिवसेनेत ऐनवेळी दाखल होऊन अनेकजण मोठे झाले आहेत. मात्र नेत्यांपेक्षा सामान्य शिवसनिकालाच बाळासाहेब सर्वात मोठे स्थान द्यायचे. आपल्या पडत्या काळात राज्यभरातील सामान्य तरुण शिवसनिकांनी केलेली मदत म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वादच असल्याचे आपण मानतो. ओळख नसताना एवढय़ा दुरून आलेल्या तरुण शिवसनिकांनी केलेली मदत भविष्यात पक्षाचे काम करण्यासाठी बळ देणारे असल्याची प्रतिक्रिया जिल्ह्यातील पहिले शाखाप्रमुख दत्तात्रय वऱ्हाडे यांनी दिली.