शाहूपुरी भागात मंगळवारी विचित्र अपघात झाला. एका ट्रकने १० ते १२ वाहनांना जोरदार धडक दिल्याने वाहनांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. ६ वाहनांचा चक्काचूर झाला आहे. यामध्ये चौघे जण जखमी झाले असून त्यांना छ. प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पळून जाणाऱ्या ट्रकचालकाला तेथील नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला असल्याचे सांगण्यात येते. या घटनेने या परिसरात तणाव निर्माण झाला होता.
शहरातील शाहूपुरी हा व्यापारी भाग म्हणून ओळखला जातो. रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेकडे ही व्यापारी पेठ आहे. रेल्वे स्थानकाला लागूनच व्यापारी पेठ सुरू होते. येथे व्यापाऱ्यांची तसेच विविध प्रकारच्या मालाची वाहतूक करण्यासाठी अनेक वाहने नेहमीच उभी असतात. वाहनतळ नसले तरी बेकायदा वाहने उभी करण्याचा प्रकार सर्रास घडतो. येथेच रेल्वे विभागाची साहित्य घेऊन एक ट्रक आला होता. ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने त्यावर ताबा मिळविणे वाहनचालकाला शक्य झाले नाही. या ट्रकने ६ दुचाकी, दोन रिक्षा व ४ चाकी वाहनांना धडक दिली.
ट्रकने धडक दिल्याने यातील काही मोटारी रिक्षा व दुचाकींचा चक्काचूर झाला होता. अपघातानंतर ट्रक चालक पळून जात होता. पण परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून त्यास पकडले. ट्रकने धडक दिलेल्या रिक्षाखाली एक रिक्षाचालक अडकला होता. लोकांनी ट्रकचालकाला ट्रक मागे घेण्यास लावल्याने रिक्षा चालकाला बाहेर काढण्यात आले. अनेक वाहनांना धडक बसल्याने वाहनचालकांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले. अपघातामुळे व्यापारी पेठेतील अनधिकृत वाहनतळाचा मुद्दा चच्रेत आला आहे.