मराठवाडा, विदर्भात गारपीट; मुंबईत रात्री गारवा, दुपारी उन्हाचा चटका

पुणे, मुंबई : राज्यात करोना विषाणूचा कहर सुरू असताना वातावरणातही विचित्र बदल होत आहेत. पूर्व आणि मध्य भारतात बंगालच्या उपसागरातून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भात   गारपीट झाली. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सध्या उन्हाचा चटका वाढतो आहे. मुंबईसह राज्यात रात्री अनेक ठिकाणी गारवा जाणवत आहे.

राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून तापमानात झपाटय़ाने बदल होत आहेत. फेब्रुवारीच्या अखेरीस तापमानात वाढ झाली होती. मात्र, मार्चच्या पहिल्या आठवडय़ात सर्वच ठिकाणी दिवसा आणि रात्रीच्या तापमानात घट झाली. उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह सुरू झाल्याने सर्वत्र रात्री थंडी जाणवत होती.

मंगळवारी (१७ मार्च) रात्री बीड आणि परभणी जिल्ह्य़ात गारांचा पाऊस झाला. बुधवारी (१८ मार्च) दुपारी लातूर जिल्ह्य़ातील वातावरण ढगाळ बनले. संध्याकाळी लातूर, अहमदपूर, औसा या तालुक्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला. विदर्भातही अनेक ठिकाणी सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. गेल्या चोवीस तासांत मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्य़ातही काही ठिकाणी गारपीट झाली.

पुढे काय?

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार १९ मार्चलाही विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाटय़ाच्या वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण विभागात या दिवशी कोरडय़ा हवामानाची स्थिती राहणार असल्याने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. २० मार्चलाही विदर्भात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्र, कोकणात तापमानवाढ

विदर्भ आणि मराठवाडय़ात पावसाळी स्थिती असल्याने तेथे दिवसा आणि रात्रीचे तापमान सरासरीखाली असल्याने गारवा जाणवतो आहे. मात्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागातील दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होत आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक, सांगली, सातारा येथील कमाल तापमान ३५ ते ३७ अंशांवर गेले आहे.  कोकण विभागात अलिबाग वगळता मुंबईसह सर्वत्र दिवसाचे तापमान सरासरीच्या पुढे गेले आहे.