रायगड जिल्ह्य़ातील माणगाव येथे स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली आहे. ऐकून नवल वाटलं ना? हो , पुण्यातील एका वकिलाने माणगावमधील आपल्या वडिलोपार्जति जागेत तब्बल दोन एकरांवर स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करून दाखवलीय.
पुण्यात व्यवसायाने वकील असलेले अ‍ॅड्. गिरीश डांगे यांची माणगावजवळच्या उसर गावाजवळ वडिलोपार्जति शेती आहे. शेतीची आवड असलेले डांगे यांनी गेल्या वर्षी आपल्या जागेत चार गुंठय़ांवर स्ट्रॉबेरीची लागवड प्रायोगिक तत्त्वावर केली. त्यातून त्यांना सुमारे ५०० किलो स्ट्रॉबेरी मिळाली. त्यामुळे त्यांचा हुरूप वाढला. या वर्षी तब्बल दोन एकरांवर त्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली. त्यातून चांगले उत्पन्न मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डांगे यांची ही शेती पूर्णपणे सेंद्रीय आहे. यात कोणतीही रासायनिक खते किंवा कीटकनाशके वापरली नसल्याचे ते सांगतात. या वर्षी उत्पादित होणारी स्ट्रॉबेरी पुण्यात विकणार असून त्यासाठी वेबसाइटच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मानस आहे. भविष्यात मुंबईतही बाजारपेठ मिळवणार असल्याचे ते सांगतात. कोकणातही स्ट्रॉबेरीची लागवड यशस्वी होऊ शकते हे डांगे यांनी दाखवून दिले आहे. कृषी अधिकारीही कोकणात स्ट्रॉबेरी लागवड शक्य असल्याचे सांगतात. विशेष म्हणजे ही स्ट्रॉबेरी माणगाव स्ट्रॉबेरी या नावानेच विकली जाते. ही फळे अतिशय चविष्ट आणि गोड असल्याचे डांगे यांनी सांगितले.
डांगे यांच्या स्ट्रॉबेरी शेतीची दखल कृषी विभागाने घेतली आहे. शेतकऱ्यांनी गट स्थापन करून स्ट्रॉबेरीची लागवड केली तर ती किफायतशीर ठरू शकते. त्यासाठी शेतकऱ्यांचे प्रबोधन केले जाणार आहे, असे कृषी अधिकारी सांगतात. कोकणातील हवामान स्ट्रॉबेरीसाठी पोषक असल्याचे दिसून येते.
यासंदर्भात रायगड जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांची सहल लवकरच डांगे यांच्या शेतावर नेऊन त्यांना स्ट्रॉबेरी लागवडीचे धडे देणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. बी. तरकसे यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी गट स्थापन करून जर याच्या विक्री व्यवस्थापनाकडे लक्ष दिले तर हे उत्पादन चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकेल, असे तरकसे यांचे म्हणणे आहे. सध्या माणगाव परिसरात ही स्ट्रॉबेरीची शेती कुतूहलाचा आणि चच्रेचा विषय ठरली आहे. डांगे यांचा हा प्रयोग सर्वासाठी नवलाईचा असला तरी कोकणातील पारंपरिक शेतीला नवीन दिशा देणारा ठरू शकतो. त्यासाठी गरज आहे ती शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्याची आणि कृषी विभागाच्या सहकार्याची.