गुरचरण जागा गायब झाल्याने गायी आल्या रस्त्यावर

रमेश पाटील, लोकसत्ता

वाडा:  नगरपंचायत कार्यक्षेत्रातील गांव, पाडय़ांवरील मोकाट जनावरांनी सध्या वाडा शहराचा आसरा घेतला आहे. शहरालगत असलेल्या गुरचरण जागांवर अतिक्रमणे होऊन तेथे वसाहती झाल्यामुळेच या मोकाट जनावरांवर शहरातील गल्ली बोळातील रस्त्यावर खायला मिळेल ते शोधण्याची वेळ आली आहे. मात्र या मोकाट जनावरांमुळे सर्वसामान्यांना होणारा त्रास कसा थांबवणार यासाठी येथील नगरपंचायत प्रशासन हतबल झालेली दिसुन येत आहे.

वाडा शहरातील बाजारपेठेत सध्या पाचशेहून अधिक मोकाट जनावरे रात्रंदिवस फिरत असताना दिसुन येत आहेत. विशेषत: बाजारपेठेतून गेलेल्या प्रमुख रस्त्यावरच या मोकाट जनावरांचे कळप फिरत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. काही वेळेस या मोकाट जनावरांच्या होत असलेल्या झुंजींमुळे अनेक अपघात होत आहेत.

काही मोकाट जनावरे ही नगरपंचायत कार्यक्षेत्रातील आहेत, तर काही परिसरातील खेडेगावातील असल्याचे बोलले जात आहे. २५ वर्षांपूर्वी नगरपंचायत परिसरात गुरचरणसाठी काही जंगल राखुन ठेवलेले होते. या गुरचरण जागांवर अतिक्रमणे झाल्याचे बोलले जात आहे. केंद्र सरकारने काही गुरचरण जागा वनपट्टेधारकांना दिल्याने गुरचरणीचे क्षेत्र कमी झाले असल्याचे बोलले जात आहे. काही वनपट्टेधारकांनी मोजून दिलेल्या जागेपेक्षा अधिकच्या जागेत अतिक्रमणे केल्याने गुरचरणीच्या जागाच राहिलेल्या नाहीत. परिणामी गुरांना चरण्यासाठी जागाच न राहिल्याने जनावरांनी शहराकडे धाव घेतली आहे.

वाडा शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी कुठलीच स्वतंत्र व्यवस्था नाही. या मोकाट जनावरांना ताब्यात घेऊन त्यांचे संगोपन करण्याची तयारी येथील श्रीराम दृष्टी गोशाळेने अनेकदा दाखवली आहे. मात्र त्यासाठी कुठल्याही प्रकारची आर्थिक तरतूद करण्यास नगरपंचायत  असमर्थ ठरल्याने मोकाट जनावरांचा प्रश्न सुटु शकलेला नाही.

तत्कालीन फडणवीस सरकारने गोकुळ गो ग्राम योजना घोषित करून नोंदणीकृत गोशाळांना २५ लाख रुपयांचे अनुदान देण्याची तयारी दाखवली होती. मात्र ही योजना प्रत्यक्षात अमलात आलीच नाही. त्यामुळे बऱ्याचशा शहरांमध्ये मोकाट जनावरांचा प्रश्न दिसुन येत आहे.

अतिक्रमित केलेल्या गुरचरण जागा मोकळ्या करा, एकही गाय रस्त्यावर फिरताना दिसणार नाही.

– किशोर कराळे , मालक, श्रीराम दृष्टी गोशाळा, वाडा.

शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या मालकांना याबाबत वारंवार ताकीद दिलेली आहे. मात्र फरक पडत नाही.

– विशाखा पाटील, उपनगराध्यक्षा, नगरपंचायत, वाडा.