भंडारा जिल्ह्य़ातील वरठी येथील घटना

गोंदिया : मोकाट कुत्र्यांनी वरठीत गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला असून गत दोन दिवसांपासून पिसाळलेल्या एका मोकाट कुत्र्याने तब्बल ११ बालकांना चावा घेतला. यामुळे पालकांत भीतीचे वातावरण पसरले असून सर्व बालकांवर वरठीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.

वरठीतील आठवडी बाजार परिसर, सुभाष वॉर्ड, शास्त्री वॉर्ड, डॉ. आंबेडकर वॉर्ड, नेहरू वॉर्ड आणि हनुमान वॉर्डात गेल्या दोन दिवसांपाूसन एका मोकाट कुत्र्याचा धुमाकूळ सुरू आहे. सोमवार व मंगळवारी या पिसाळलेल्या कुत्र्याने आठवडी बाजारात आलेल्या दोन बालकांवर हल्ला चढवला. तर मंगळवारी सकाळी पुन्हा या कुत्र्याने धुमाकूळ घालणे सुरू केले. कुवर श्रीवास्तव (१३), सचिन माळवे (१३), कृष्ण दास (१३), आरव सक्सेना (१६), स्पर्श खोब्रागडे (३), गौरी कारेमोरे (६), सनया उके (२), आलिया बोदले (४), आदेश हिंगे (१५), या बालकांसह शुद्धोधन बोरकर (४५) आदी या पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

सर्व बालकांवर आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास मेश्राम या जखमी बालकांवर उपचार करीत आहेत. लहान मुले यात सर्वाधिक जखमी झाले आहेत. या मोकाट पिसाळलेल्या कुत्र्यांसह परिसरातील कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील पालकांनी केली आहे.