रेबीज लसअभावी परवड

यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील मुळावा येथे गुरुवारी सायंकाळी एका तासात तब्बल ४१ नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने गावात प्रचंड दहशत पसरली. या रुग्णांना उपचारासाठी मुळावा व उमरखेड येथील रुग्णालयात नेण्यात आले असता तिथे रेबीज लस उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारासाठी नांदेड यवतमाळ येथे पाठवण्यात आले. या घटनेत वृद्धांसह, शाळकरी विद्यार्थी आणि लहान मुले गंभीर जखमी झाले आहेत.

मुळावा येथे गुरुवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास एका पिसाळलेल्या कुत्र्याने रस्त्यावर ये-जा करणाऱ्यानागरिकांना अचानक चावा घेण्यास सुरुवात केल्याने एकच धावपळ उडाली. गावातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी पूर्वीच ग्रामपंचायतीकडे केली होती. मात्र, ग्रामपंचायतने त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही घटना घडून नागरिकांना इजा पोहोचल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

या? घटनेत तब्बल ४१ नागरिक जखमी झाले. त्यात सय्यद पटेल, कार्तिक हिवरे, अविष्कार काळसरे, शंकर काळसरे, पल्लवी  टेकाळे, सदा जोगदंडे, शंकर चव्हाण आदींचा समावेश आहे. जखमीत एक वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. मुळावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उमरखेडच्या ग्रामीण रुग्णालयात रेबीज लस उपलब्ध नसल्याने रुग्णांची परवड झाली. अनेकांनी खासगी दवाखान्यात उपचारासाठी धाव घेतली. मुळावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पिसाळलेला कुत्रा चावल्याचे रॅबीज लस उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना उपचारासाठी यवतमाळ व नांदेड येथे पाठवण्यात आल्याची माहिती मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी किशोर कपाळे यांनी दिली. घाबरलेल्या नागरिकांनी पिसाळलेल्या कुत्र्याचा शोध घेऊन त्याला अखेर ठार मारले.