कल्पेश भोईर

वसई-विरार शहरात भटक्या श्वानांचा उपद्रव ही सर्वात मोठी समस्या ठरत आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२० या आठ महिन्यांच्या कालावधीत शहराच्या विविध भागांत १३ हजार ८८७ श्वानदंशाच्या घटना घडल्या आहेत. दिवसाला सरासरी ५८ जणांचा श्वानांनी चावा घेतला आहे. शहरातील श्वान निर्बीजीकरण केंद्रांची रखडपट्टी हे त्यामागील प्रमुख कारण आहे.

पालिकेच्या वतीने आजवर लशींवर मागील तीन वर्षांत दीड कोटी रुपये खर्च झाले आहेत. काही महिन्यांपासून भटक्या श्वानांचा वावर हा मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. घराबाहेर खेळत असलेल्या लहान मुलांवर भटक्या श्वानांनी हल्ला केल्याच्या घटना ताज्या आहेत. मध्यरात्री कामावरून परतणाऱ्या नोकरदार व्यक्तींनाही श्वानांनी लक्ष्य केले आहे. दुचाकीस्वारांवर श्वानांनी झेप घेणे तर नित्याचेच झाले आहे. भटक्या श्वानांचे समूह असतात. कधीकधी श्वान समूहानेच हल्ले चढवतात, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पालिकेचे केवळ एकच निर्बीजीकरण केंद्र आहे. त्यांच्यामार्फत प्रयत्न केले जातात. परंतु करोना काळात तेही काम थंडावले असल्याने याचा सर्वाधिक परिणाम शहरावर होऊ लागला आहे.

शहरातील गल्लोगल्ली सैरावैरा फिरणाऱ्या श्वानांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणेसुद्धा कठीण झाले आहे. नुकताच काही दिवसापूर्वी नायगाव पूर्वेतील जूचंद्र  परिसरात भटक्या श्वानांनी एका तीन वर्षीय चिमुकलीवर हल्ला चढवला होता. या हल्लय़ात ही चिमुकली गंभीर जखमी झाली होती. तिच्या चेहऱ्यावरच श्वानांनी हल्ला केला होता. तर त्यासोबत नऊ वर्षीय मुलीसह इतरांनाही भटक्या श्वानाने चावा घेतला  होता. तर आठ वर्षांपूर्वी  विरार फुलपाडा येथील एका नऊ वर्षीय चिमुकलीवर श्वानाने हल्ला केला होता. आजही त्या मुलीच्या चेहऱ्याची अवस्था खूप बिकट असून पूर्ण चेहरा विद्रूप झाला आहे. अशा अनेक घटना वसईत घडल्या आहेत. हे सर्व चित्र समोर असूनही पालिका याबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे.

रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांचा श्वान पाठलाग करतात. कधी लक्ष नसल्यास अचानकपणे चावा घेण्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर काही ठिकाणी मुख्य रस्त्याच्या ठिकाणी हे श्वान ये-जा करणाऱ्या  वाहनचालकांच्या अंगावर धावून जात आहेत. यामुळे अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. सध्या या भटक्या श्वानांना खाण्यासाठी काही मिळत नसल्याने विविध भागातूनही श्वान हळूहळू एका भागातून दुसऱ्या भागात येत आहेत. तर काही ठिकाणी पाळीव कोंबडय़ांचा पाठलाग करून त्यांच्यावर  हल्ला चढवून त्याही फस्त केल्या जात असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

भटक्या श्वानांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत आहे. असे असताना त्यांच्या निर्बीजीकरणाची प्रक्रिया खूप धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे या भटक्या श्वानांवर नियंत्रण मिळविणे कठीण होऊन बसले आहे. वसई- विरारमधील अनेक ठिकाणी रस्त्यावरच कचरा टाकला जातो. यामुळे  कचऱ्याच्या सोबतच शिळे खाद्यपदार्थ टाकून दिले जातात. याचा शोध घेण्यासाठी श्वान हे सर्व कचरा तोंडात पकडून रस्त्यावर पसारा करतात.  यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरत असते. असे प्रकार घडू नये यासाठी नागरिकांनीसुद्धा कचरा उकिरडय़ावर न टाकता कचरा कुंडीत टाकणे गरजेचे आहे. जास्त प्रमाणात कचरा जमा होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. त्याचबरोबर लोकांनीही हातातील उरलेसुरलेले काहीही रस्त्यात टाकण्याची, फेकण्याची सवय सोडायला हवी. शहरात सध्या भटक्या श्वानांच्या वाढत्या उपद्रवाने गंभीर स्वरूप धारण केले आहे.

श्वानशाळांना प्रतिसाद शून्य

महापलिकेचे सध्या वसई नवघर परिसरात एकमेव निर्बीजीकरण केंद्र आहे. त्यामुळे संपूर्ण भार हा एकाच केंद्रावर आहे. तेथील केंद्रातही अनेक प्रकारच्या अडचणी आहेत. या ठिकाणी श्वानांना पकडण्यासाठी केवळ एकच वाहन आहे, काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाची संख्याही कमी आहे. पालिकेने भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभाग समिती सी व ई मध्ये निर्बीजीकरण केंद्र प्रस्तावित केली होती. त्याचाही प्रस्ताव गुंडाळून ठेवावा लागला. श्वानांच्या देखभालीसाठी तयार करण्यात येणाऱ्या श्वानशाळांनाही प्रतिसाद मिळालेला नाही.