नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील संघर्षांतून तासगांव तालुक्यातील गव्हाण येथे भाजपाचे खा. संजयकाका पाटील यांचे फलक फाडण्याचा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तासगांवचे पोलीस निरीक्षक रमेश बनकर यांनी शांतता समितीची बठक घेऊन गावातील सर्वच डिजिटल पोस्टर काढण्याची सूचना केली. सायंकाळपर्यंत पोस्टर काढण्याचे काम सुरू होते.
गव्हाण येथील सिद्धेश्वर देवाची यात्रा दि. १४ ते १६ मे दरम्यान होती. या कालावधीत यात्रेकरुंच्या स्वागतासाठी ५० पोस्टर लावण्यास ग्रामसेवक पांडुरंग कुंभार यांनी लेखी परवानगी दिली होती. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच खा. संजयकाका पाटील यांचे अभिनंदन करणारे पोस्टर लावण्यात आले होते. हे पोस्टर अज्ञातांनी रात्री फाडल्यामुळे गावात राजकीय संघर्ष निर्माण झाला होता. संजयकाका समर्थकांनी गावात टायर पेटवून निषेध केला. दोन्ही गटाचे कार्यकत्रे जमू लागले. ही माहिती कळताच निरीक्षक रमेश बनकर यांनी तातडीने गव्हाणला धाव घेऊन उभय गटाच्या कार्यकर्त्यांची बठक घेतली. या बठकीस स्वप्निल पाटील-सावर्डेकर, अभिजित पाटील, आनंदा पाटील आदींसह प्रमुख कार्यकत्रे उपस्थित होते. या बठकीत सर्वच पोस्टर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला आहे.