News Flash

दर्डाच्या शाळेतील प्रकरणी दोषींवर कडक कारवाई होणार -संजय राठोड

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून याच शाळेत विद्यार्थ्यांना शिकता येईल,

दर्डाच्या शाळेतील प्रकरणी दोषींवर कडक कारवाई होणार -संजय राठोड

दर्डा वायपीएसमध्ये घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे. या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करीत असलेल्या महिला आणि संतप्त जमावावर पोलिसांनी केलेला लाठीमारही निषेधार्ह असून त्यांनी कोणत्या परिस्थितीत लाठीमार केला, याची चौकशी करून दोषी पोलिसांवरही कारवाई केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी वार्ताहर परिषदेत दिली.
या प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या संस्थेच्या सचिवांनाही अटक केली जाईल. शिवाय, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. दरम्यान, राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी शिक्षण विभागाची एक चमू यवतमाळात पाठवली असून शाळा ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून याच शाळेत विद्यार्थ्यांना शिकता येईल, अशी व्यवस्था सरकारच्या वतीने केली जात आहे.
विमानतळाचे नामांतर सरकार दरबारी कायम करू
जवाहरलाल दर्डा विमानतळावर हल्ला चढवून संतप्त जमावाने शनिवारी दर्डाच्या नामफलकाच्या जागी संत गाडगेबाबा विमानतळ, असा फलक लावून जे नामांतर केले ते आता कायम ठेवावे, अशी जनभावना आपण मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवणार असल्याची माहिती सेना नेते पालकमंत्री संजय राठोड यांनी वार्ताहर परिषदेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. विरोधात असताना आपण विमानतळाला जवाहरलाल दर्डा हे नाव देऊ नये, या जनभावनेची कदर करीत प्रचंड आंदोलन केले होते. मात्र, काँग्रेसचे सरकार असल्याने जनतेच्या प्रचंड विरोधानंतरही सरकारने विमानतळाला दर्डाचे नाव दिले. आता मात्र जनतेनेच गाडगेबाबांचे नाव देऊन नामांतर करून टाकले आहे. त्याला शासन मान्यता मिळावी म्हणून आपण प्रयत्न करू, असेही पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले.

पालकमंत्र्यांचाही खरपूस समाचार
बचत भवनात पालकमंत्री सेना नेते संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह आणि पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग यांच्या उपस्थितीत पालक आणि नागरिकांची या प्रकरणात सभा घेतली तेव्हा पालकमंत्र्यांचाही नागरिकांनी खरपूस समाचार घेतला. शहरात अत्यंत घृणास्पद घटना घडलेली असताना पालकमंत्री मात्र आपला वाढदिवस थाटात साजरा करीत आहात, असा आरोप पालकांनी केला. नेहमी दुर्गावतार धारण करून मदान गाजवणाऱ्या सेनेच्या खासदार भावना गवळी कुठे आहेत, असा सवालही यावेळी विचारण्यात आला.

शांतता राखा -आ. मदन येरावार
या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. दोन शिक्षकांना अटक झाली आहे. कोणाही दोषींना वाचवण्याचा अजिबात प्रयत्न नाही. जनतेने शांतता राखावी, असे भाजप आमदार मदन येरावार यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2016 2:30 am

Web Title: strict action will take against the accused in darda school case
Next Stories
1 ‘रसना’ समजून बालिकेकडून विषारी द्रव्य प्राशन
2 मतदार याद्यांचा निरंतर पुनरीक्षण कार्यक्रम
3 अलिबाग नगर परिषदेत १७ जागांपकी ९ जागा महिलांसाठी आरक्षित
Just Now!
X