विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ९ डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार असून, या वेळी सुरक्षा यंत्रणेने आधुनिक तंत्रज्ञानाचा पूर्ण वापर करून सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. पुढील वर्षी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका असल्याने यंदाचे हिवाळी अधिवेशन शेवटचे ठरणार आहे. विधिमंडळाच्या इतिहासातील सर्वात कमी, एक आठवडय़ाच्या कालावधीचे अधिवेशन म्हणून यंदाच्या हिवाळी अधिवेशनाची नोंद होईल.
नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरक्षा अधिक कडक केली जात आहे. यंदा ३४ सीसीटीव्ही कॅमेरे विधान भवन परिसरात बसविण्यात आले आहेत. विधानभवनाभोवतीच्या संरक्षक भिंतीची उंची वाढविण्याचे काम सुरू झाले आहे. गुप्तचर सूत्रांच्या अहवालात नागपूर शहर दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचा इशारा देण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी १४ कॅमेरे स्थिर असून अन्य कॅमेरे फिरते आहेत. यातून मोर्चेकरी तसेच संशयितांच्या हालचाली टिपता येतील. अधिवेशनाच्या काळात २००४ वाहने सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात केली जातील. यात जिप्सी, ट्रक्स आणि टँकर्सचा समावेश राहील. विधानभवनाबरोबरच रविभवन, नागभवन, आमदार निवास आणि मंत्र्यांच्या निवासस्थानांवरील सुरक्षेत वाढ केली जात आहे.