लातूर : करोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता व या महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात शेतीच्या कामासाठीची गर्दी पुन्हा होणार हे लक्षात घेऊन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी ८ ते १३ मे या सहा दिवसांसाठी जिल्ह्य़ात कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश दिलेले आहेत.

जिल्हाभरात गेल्या २० दिवसांपासून शनिवार व रविवार असे दोन दिवस अतिशय कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत किराणा मालाची दुकाने, भाजी व फळ विक्रीसही बंदी करण्यात आलेली आहे. करोनाबाधितांची संख्या कडक निर्बंध लागू करून तीन आठवडे उलटूनही फारशी कमी होत नसल्याने आता येणाऱ्या आठवडय़ात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

८ ते १३ मे या कालावधीत औषधे, दूध व पाणी याचीच विक्री करता येणार आहे. वर्तमानपत्राच्या वितरणाला परवानगी आहे. मात्र, या व्यतिरिक्त कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. १५ मे नंतर शेतीविषयक कामाची लगबग सुरू होईल. पेरणीच्या पूर्वतयारीसाठी बाजारात बी—बियाणे व खतांच्या खरेदीसाठी गर्दी होईल. करोना रुग्णांची संख्या दखलपात्र कमी झालेली नाही. शिवाय आगामी काळात प्राणवायूचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. त्यामुळे करोना रुग्णांची संख्या कमी करण्याला पर्याय नाही. त्यासाठी हे निर्बंध लादण्यात आले असून जनतेने याचे कडक पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.

गुरुवारी संध्याकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी हे आदेश काढल्याचे समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी ७ ते ११ या वेळेत भाजीपाला, फळे आणि किराणा माल खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत ग्राहकांची तोबा गर्दी दिसून आली. या गर्दीमुळे करोनाचा प्रसार कमी होण्याऐवजी वेगाने वाढू शकतो.

लातूर जिल्ह्य़ात ८ ते १३ मे या कालावधीत कडक र्निबध लागू होणार असल्याने ७ मे रोजी सकाळीच लातूर बाजारपेठेत उसळलेली ग्राहकांची गर्दी.