व्यापारीवर्गासह सर्वसामान्यांना दिलासा

कराड : सातारा जिल्ह्यत करोनाबळी व रुग्णवाढ सतत झेपावल्याने लागू करण्यात आलेल्या कडक टाळेबंदीमध्ये संसर्गाची तीव्रता निवळल्याने शिथिलता आणण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल सव्वा महिन्यानंतर ‘टाळेमुक्ती’ होत असल्याने व्यापारीवर्गासह शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नव्या आदेशान्वये अत्यावश्यक व जीवनावश्यक बाबींनाच सवलत देताना, गर्दी टाळण्याचा कटाक्ष तंतोतंत पाळला आहे.

सातारा जिल्ह्यला करोनाची गंभीरस्थिती ओसरल्याने आज रविवारी रात्री १२ वाजल्यापासून सक्त र्निबधामधून गरजेच्या बाबींसाठी सवलत देण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी अडीच हजारांवर झेपावलेली रुग्णसंख्या निम्म्याहून अधिक घटताना, त्याच प्रमाणात करोना बळींची संख्याही कमी झाली आहे.

दरम्यान, राज्य शासनाने निकषांच्या आधारे केलेल्या पाच गटात सातारा जिल्ह्यचा चौथ्या गटात समावेश आहे. त्यानुसार सकाळी ७ ते २ व सकाळी ७ ते सायंकाळी ४ अशा दोन गटात जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना तसेच प्रवासी वाहने, एसटी बसेस, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग यांना अटींच्या अधिन राहून परवानगी देण्यात आली आहे. अत्यावश्यक नसलेली दुकाने, आस्थापना तसेच अत्यावश्यक गरजेव्यतिरिक्त फिरण्यास पूर्णत: बंदी राहणार आहे. मॉल, चित्रपटगृहे, उपाहारगृह, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक प्रार्थनास्थळे व कार्यक्रमांना मज्जाव राहणार असला तरी, स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकीसाठी सभा, बैठकांना मर्यादेच्या निम्म्या क्षमतेने उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. शासकीय कार्यालये, सर्व प्रकारच्या बँका, वित्तीय संस्था यांना अटी व शर्थीच्या अधिन राहून परवानगी राहणार आहे. गर्दीच्या ठिकाणांना पूर्णत: मज्जाव असून, त्याचे उल्लंघन झाल्यास सदर आस्थापनेकडून १० ते २५ हजार रुपये व प्रत्येक व्यक्तीवर एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल. नियमांचे पुन्हा उल्लंघन झाल्यास एक लाखांपर्यंत दंड आणि फौजदारी कारवाई होणार आहे. लग्न कार्यास सर्वजण मिळून २५ तर, अंत्यविधीसाठी २० लोकांनाच उपस्थितीची परवानगी राहणार आहे. वैद्यकीय सुविधा, औषधालये, शिवभोजन थाळी यांना वेळेच्या मर्यादेतून वगळण्यात आले आहे.