शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी पहाटे पाचपर्यंत करोनाच्या पार्श्वभूमिवर टाळेबंदीची अधिक कठोरपणे अमलबजावणी करण्यात येणार आहे.

टाळेबंदी असतांनाही शहरासह जिल्ह्यात नागरिक विनाकारण बाहेर फिरतांना दिसतात. वाहने घेऊन भटकंती करीत असल्याने जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून दीड दिवसांसाठी टाळेबंदी अधिक कठोर करण्याचे ठरविले आहे. जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी यासंदर्भातील आदेश काढले आहेत. जिल्ह्याच्या सीमेवर करोना येऊन ठेपला आहे. मालेगाव येथे पाच करोनाबाधित रूग्ण आढळल्यानंतर धुळे जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. त्यानुसार कोणालाही रस्त्यावर फिरणे, वाहतूक करणे, रस्त्यावर उभे राहणे, रेंगाळणे या सर्व कृत्यांना मनाई करणारा आदेश काढण्यात आला आहे. अत्यावश्यक आरोग्य सेवा आणि कायदा सुव्यवस्थेसाठीचे मनुष्यबळ यांचा अपवाद असेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, धुळे जिल्ह्यात शेजारील मालेगाव आणि मध्यप्रदेशातील सेंधवा येथून अनेक जण येत असतात. त्यामुळे धुळे जिल्ह्यास करोनाचा धोका होऊ नये यासाठी प्रशासनाने नाकाबंदी अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. पाच दिवसांपूर्वी बाहेरील कोणी व्यक्ती धुळ्यात आली असेल तर त्यांनी तातडीने आरोग्य यंत्रणा, पोलिसांना माहिती द्यावी. माहिती लपविल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित यांनी दिला आहे. धुळे जिल्ह्यालगत १८ ठिकाणी सीमांवर आठ ठिकाणच्या राज्यांच्या सीमांवर नाकाबंदी कठोर करण्यात आली आहे. कर्मचारी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असल्याचे अधिक्षक पंडित यांनी नमूद केले.

पोलिसांच्या र्निजतुकीकरणासाठी विशेष वाहन

धुळ्यातील रस्त्यावर बंदोबस्त देणाऱ्या पोलिसांसाठी र्निजतूकीकरण वाहन तयार करण्यात आले आहे. या वाहनात शिरल्यानंतर शरीरासह गणवेशही र्निजतूक होईल. वाहनाबाहेर हात र्निजतूक करण्याची व्यवस्था आहे. या वाहनात २०० लिटर रसायन असून ते सतत फवारण्यात येणार आहे. या वाहनाची बुधवारी चाचणी घेण्यात आली. करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सध्या सर्वजण घरामध्ये आहेत. परंतु, पोलिसांचे काम वाढले आहे. धोका पत्करून पोलिसांना काम करावे लागत असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीसस मुख्यालयातील एक व्हॅन र्निजतूकीकरणासाठी तयार करण्यात आली आहे. ही व्हॅन बंदोबस्त असलेल्या ठिकाणी थांबेल. व्हॅनमध्ये आणि बाहेर असलेल्या व्यवस्थेमुळे पोलिसांना आपले हात स्वच्छ करता येतील. या व्हॅनमधील चाचणीप्रसंगी पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित, अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ. राजू भुजबळ यांनी पाहणी केली. इतर कर्मचाऱ्यांनाही स्वच्छतेची सुचना केली.

डॉ. आंबेडकर जयंती संयमाने साजरी करण्याचा निर्णय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी जयंती असून करोनाच्या पार्श्वभूमिवर जयंती संयमाने साजरी करण्याचा तसेच घरातच राहून महामानवास अभिवादन करण्याचा निर्णय गुरूवारी धुळे जिल्ह्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला. महामारीचे संकट आपल्या शहरात, घरात येणार नाही, याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी. महामानवाला घरातच अभिवादन करून आपला जिल्हा करोनामुक्त ठेवण्याचा निर्धार प्रत्येकाने करावा. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन बैठकीत पोलीस अधिक्षक चिन्मय पंडित यांनी केले.बैठकीस ज्येष्ठ नेते एम. जी. धिवरे, वाल्मिक दामोदर, पालिकेतील स्थायी समिती सभापती सुनील बैसाणे, भय्या पारेराव आदी उपस्थित होते. पुतळ्याला अभिवादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह ते ठरवतील त्या चार किंवा पाच जणांना परवानगी देण्यात येईल. शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पंडित यांनी दिला.