करोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अमरावती विभागातील सर्व पाचही जिल्ह्यात सुधारित प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. याबाबत विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी पाचही जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर सूचना दिल्या आहेत. या सूचनांमध्ये प्रामुख्याने दुकानांच्या वेळा सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहणार असून, विवाह समारंभाकरिता २५ व्यक्तींनाच परवानगी असणार आहे. सदरचे निर्बंध हे १ मार्च २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत राहणार आहेत.

अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये करोना विषाणुचा प्रादुर्भाव सर्वदूर दिसून येत आहे. अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यातील करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागांमधील प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करून सदर भागाच्या सीमा निश्चित करून या क्षेत्रांमध्ये विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अमरावती विभागातील शहरी आणि ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता प्रतिबंधित क्षेत्र वगळता उर्वरित शहरी आणि ग्रामीण भागासाठी सुधारित निर्देश देण्यात आलेले आहेत.

दुकाने आणि आस्थापनं सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरू असणार –
यात सर्व प्रकारची दुकाने आणि आस्थापना ही सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील. महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपालिका क्षेत्रातील जे उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी यापूर्वीच देण्यात आलेली आहे, ते उद्योग नियमितपणे सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सर्व प्रकारची शासकीय कार्यालये ही १५ टक्के किंवा १५ व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल, ती ग्राह्य धरून सुरू ठेवण्यात येतील. तसेच सर्व प्रकारच्या खासगी कार्यालयातील आस्थापना या एकूण १५ टक्के किंवा कमीत कमी १५ कर्मचारी यापैकी जी संख्या जास्त असेल, ती ग्राह्य धरून सुरू ठेवण्यात येतील. ग्राहकांनी खरेदीसाठी जवळ असलेल्या बाजारपेठ, अतिपरिचित दुकानदार यांच्याकडे खरेदी करावी. शक्यतो दूरचा प्रवास करून खरेदी करणे टाळावे. सर्व प्रकारची उपहारगृहे हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधा देण्यास परवानगी राहील. लग्न समारंभाकरिता वधू व वर पक्षासह पंचवीस व्यक्तींना परवानगी राहील. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालय येथील अशैक्षणिक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे इत्यादी कामांकरिता परवानगी राहील.

बसमधील एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांना परवानगी –
मालवाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहील आणि वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाहीत. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक करताना चारचाकी वाहनांमध्ये चालकाव्यतिरिक्त इतर तीन प्रवासी, तीन चाकीमध्ये चालकाव्यतिरिक्त दोन प्रवासी, दुचाकीवर हेल्मेट व मास्कसह दोन प्रवासी यांना परवानगी राहील. आंतरजिल्हा बस वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांसह सोशल डिस्टंसिंग व निर्जंतुकीकरण करून वाहतुकीसाठी परवानगी राहील. यासाठी विभागीय नियंत्रक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ हे नियोजन करतील.

शाळा, महाविद्यालयं, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद राहणार –
सर्व धार्मिक स्थळे ही एकावेळी दहा व्यक्तींपर्यंत मर्यादित स्वरूपात सुरु राहील. भाजी मंडई सकाळी तीन ते सहा या कालावधीत सुरू राहील. सदर मंडईमध्ये किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहिल. संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खासगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद राहतील. संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे बंद राहतील. संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलने या कालावधीत बंद राहतील.

येत्या काळात सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू राहतील. आठवडाअखेर शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत असलेल्या संचारबंदीच्या वेळी दुकाने बंद राहतील. आठवडाअखेर असलेल्या संचारबंदीच्या वेळी दूध विक्रेते यांची दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत आठवड्याचे संपूर्ण सात दिवस नियमितपणे सुरू राहतील. सद्यस्थितीमध्ये मिशन बिगीन अगेन अंतर्गत जी सूट देण्यात आलेली होती, ती रद्द करून सदरचे निर्बंध १ मार्च २०२१ रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत लागू करण्यात येत असुन, याबाबतचे निर्देश विभागीय आयुक्त यांनी एका पत्राद्वारे दिले आहेत.