भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात करोनाचा कहर वाढत असल्यामुळे पालिका प्रशासनाकडून कठोर नियमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यात भाजी, किराणा आणि दूध विक्रेत्यांना सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे, तर शनिवार आणि रविवारी कठोर टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

मीरा-भाईंदर शहरात महिनाभरापासून करोनाबाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यात रविवारी समोर आलेल्या अहवालानुसार ३३७ रुग्णांना करोनाचा संसर्ग झाला असून एकूण आकडा  ३७ हजार ८५१ वर जाऊन पोहचला आहे. तर ११ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागल्याने एकूण मृत्यूची संख्या ९१६ इतकी झाली आहे.  अशा परिस्थितीत रुग्ण संख्या आटोक्यात आणणे प्रशासनाला कठीण होत असल्याचे दिसून आहे.

वाढत्या करोना परिस्थितीला आटोक्यात आणण्याकरिता राज्य शासनाकडून ‘मिशन  ब्रेक द चेन’ ही मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार मीरा-भाईंदर   महानगरपालिका प्रशासनामार्फत निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र तरी देखील नागरिक नियमांचे पालन करत नसल्याने यात गंभीर वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णांना खाटा, प्राणवायू  आणि  रेमडेसिविरसारख्या औषधाचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे.

यामुळे नियम अधिक कठोर करत १९ एप्रिल ते २३ एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकानांना बंदी घालण्यात आली आहे.

यात किराणा दुकाने आणि भाजी बाजार हे केवळ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे तसेच शनिवार आणि रविवार कठोर टाळेबंदी असल्याने या दिवशी पूर्णत: बंदच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दूध डेअरी विक्रेत्यांना दररोज ७ ते ११ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तसेच औषध विक्रेत्यांना  नियमानुसार २४ तास केवळ औषधेच विकण्याचे आदेश आयुक्त दिलीप ढोले यांनी दिले आहेत. तसेच परिस्थिती गंभीर असल्याने राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सभागृह नेते प्रशांत दळवी यांनी जनतेला केले आहे.