अरबी सुमुद्रात निर्माण झालेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा मंडणगड, दापोलीसह गुहागर तालुक्यांना बसला. पहाटेपासून सुरु झालेल्या वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात दाणादाण उडवली. ताशी ८० ते ११० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे घरांची छपरे, बिल्डींगवरील पत्रे उडवून नेली. झाडेच्या झाडे उन्मळून घरावर कोसळत होती. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. विद्युत खांबासह वाहिन्या कोसळल्यामुळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित होता.

हवामान विभागाकडून मिळालेल्या सुचनेनुसान निसर्ग चक्रीवादळ पहाटेच्या सुमारास रत्नागिरी किनारपट्टीवर धडकले. मंगळवारी रात्री हलके वारे आणि पाऊस सुरु होता; मात्र पहाटे पाच वाजल्यापासून वादळाने रौद्ररूप धारण केले. जिल्ह्यातील किनारी भागात त्याची तीव्रता अधिक जाणवत होती. राजापूरला पहिला फटका बसला. त्यानंतर रत्नागिरी शहर आणि तालुक्यात त्याचा प्रभाव जाणवू लागला. वादळाच्या टप्प्यात आलेली झाडे, घरांचे छपरे यासह बिल्डींगवरील पत्रे हवेत उडून जात होते. वाऱ्यामुळे झाडे पिळवटून टाकली जात होती. रत्नागिरीमध्ये वाऱ्याचा वेग ७० ते ८० किलोमीटर वेग होता. संगमेश्वर तालुक्यात तुलनेत वाऱ्याचा वेग कमी होता; परंतु घरा-गोठय़ांचे नुकसान मोठय़ा प्रमाणात झाले आहे. रत्नागिरीत घरावर झाड कोसळल्यामुळे पाच जणांना दुखापत झाली आहे. रत्नागिरी शहरासह, पूर्णगड, काळबादेवी, मालगुंड, वरवडे, जयगड, नांदिवडे, करबुडे, निवळी या भागात नुकसान झाले आहे.

वादळाचा केंद्रबिंदू अलिबाग असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड तालुक्यासह गुहागर किनारपट्टीवर वादळाचा कहर बरसला. समुद्र खवळल्यामुळे किनाऱ्यावर नांगर टाकून उभ्या केलेल्या नौका एकमेकांवर आदळत होत्या.

वेगवान वाऱ्यांमध्ये बाहेर पडून नौका सावरणेही अशक्य होते. यामध्ये अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. दापोली तालुक्यातील तेवीस गावांना याचा तडाखा बसला असून हर्णे, पाजपंढरी, गव्हे, आसूदला वादळाने अक्षरश: झोडपून काढले. समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने लगतच्या काही घरांमध्ये समुद्राचे पाणी घुसले होते; परंतु घरातील लोकांचे स्थलांतर केल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही.

दापोलीतील आंजर्ले, कुंभे या रस्त्यावर झाडे कोसळल्यामुळे वाहतूक खंडित झाली होती. पाजपंढरी येथील अनेक घरे समुद्रकिनाऱ्याला लागूनच असल्याने या घरात राहणाऱ्या कुटुंबांना खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय यंत्रणेने काल रात्रीच सुरक्षित ठिकाणी हलविले होते. गुहागर किनारी भागात वादळाचा परिणाम जाणवला.

हरिहरेश्वरला मोठय़ा प्रमाणावर दणका मिळेल, असा अंदाज होता. तो बऱ्याच प्रमाणात खरा ठरला. रत्नागिरी जिल्ह्याच्या पलीकडच्या बाजूला हरिहरेश्वर असल्याने आणि सागरी तुफानामुळे मंडणगडच्या किनारी भागातील वेळास, बाणकोट, वाल्मिकीनगर, नारायणनगर येथील अडीच हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले होते. चक्रीवादळाचा अंदाज आधीपासून मिळाल्याने हे शक्य झाले. यापैकी बहुतांश लोकांचे कालच स्थलांतर केले होते. मात्र काहीजण तयार नव्हते.

आज सकाळी त्यांना हलवण्यात आल्यामुळे सारे बचावले. या गावातील सुमारे ६० टक्के घरांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. त्याचा अंदाज घेण्यासाठी प्रशासन तिथे पोचूही शकत नव्हते, अशी सायंकाळपर्यंत अवस्था होती.

वादळामुळे रत्नागिरीतील मिरकरवाडा येथे भल्यामोठय़ा २ जहाजांनी काल  सायंकाळनंतर आसरा घेतला होता. हे दोन्ही जहाजे भगवती बंदर जेटी येथे नांगर टाकून उभी होती. यापैकी एका जहाजाला निसर्ग वादळाचा जोरदार फटका बसला असून जहाजाचा नांगर तुटला आहे. नांगर तुटल्याने ते जहाज भरकटले. या बार्जमध्ये अडकलेल्या तेरा जणांना सायंकाळी उशिरा सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.