प्रशांत देशमुख

गांधीवादी परिवारातील ‘सर्व सेवा संघ’ आणि ‘सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान’ या दोन सर्वोच्च संस्थांमधील वाद कमालीचा विकोपास गेल्याने गांधीवादी कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. या संस्थांमधील मंडळी अध्यक्षपदाच्या वादातून न्यायालयात तर जाणार नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.

सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.एन.आर. प्रभू यांनी मार्चमध्ये राजीनामा दिला होता. तो परत घेतल्याचे त्यांनी दोन दिवसांपूर्वी  जाहीर केले. परंतु, अध्यक्षाच्या नियुक्तीचे अधिकार असणाऱ्या सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेवभाई विद्रोही यांनी मात्र, प्रभू यांनी राजीनामा परत घेण्याचा प्रश्नच उपस्थित होत नसल्याचे म्हटले आहे. प्रभू यांना पदच्युत केल्याने हा विषय संपल्याचे ते सांगतात.

सर्व गांधीवादी संस्थांची शिखर संस्था असणाऱ्या सर्व सेवा संघातर्फे  प्रतिष्ठानच्या अध्यक्षाची पाच वर्षांसाठी निवड केली जाते. तसेच दोन विश्वस्त व दोन संचालक तेच नियुक्त करतात. याखेरीज एक आश्रमवासी व गांधी स्मारक निधीचा अध्यक्ष असे दोन मिळून सात संचालक असतात. या सात संचालकांना आश्रमाच्या हितचिंतक असणाऱ्या गांधीवाद्यांमधून पुन्हा सात संचालक निवडण्याचे अधिकार आहेत. सध्या बारा सदस्यांचे संचालक मंडळ कार्यरत आहे.

विद्रोही यांचा आश्रमाचा कारभारातील हस्तक्षेप मान्य नसल्याने राजीनामा दिला. त्यावर काहीच प्रतिक्रिया आली नाही, या दरम्यान देशभरातील मान्यवरांनी राजीनामा न देता कार्यरत राहण्याचे सुचवल्याने आपण राजीनामा परत घेतल्याचे प्रभू सांगतात. विद्रोही यांना मला हटविण्याचा अधिकारच नाही. प्रतिष्ठानचे संचालकच निर्णय घेऊ शकतात. मंडळाची बैठक न झाल्याने राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. अशा स्थितीत परत अध्यक्षपद स्वीकारणे मला भाग पडल्याची भूमिका प्रभू यांनी मांडली आहे.

अध्यक्षपदावरून एकाद्याला काढण्याचा अधिकार आहे का, या प्रश्नावर विद्रोही म्हणतात की जो नियुक्त करतो, तो बरखास्तही करू शकतो. विद्रोहींची हीच भूमिका शंकास्पद ठरते. आचार्य विनोबा भावे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली प्रतिष्ठानची नियमावली अध्यक्षांच्या पदच्युतीबाबत तरतूद सांगत नाही. या पदावर येणारी व्यक्ती ही योग्य पात्रतेची असल्याने तिला पदावरून काढण्याचा प्रश्नच नाही, असे संकेत यामागे असल्याचे सांगितले जाते. मात्र आज या नैतिक मूल्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

विवेकनिष्ठेला तिलांजली

प्रतिष्ठानचेच एक संचालक अविनाश काकडे यांनी हे चित्र विदारक असल्याची भावना व्यक्त केली. आज गांधींचा विवेकनिष्ठ आचरणाचा विचारच दिसत नाही. गांधींच्या विचारात निरासक्तीला महत्त्व आहे. मात्र ही मंडळी पदासाठी आसक्त झाल्याचे दिसते, अशी उद्विग्न भावना  काकडे यांनी व्यक्त केली आहे.

गोडसेवादाची ठिणगी..

प्रभू हे गोडसेवादी असल्याचा साक्षात्कार त्यांना स्वत:च नियुक्त करणाऱ्या विद्रोहींना आता झाला आहे. हिंदुत्ववाद्यांनी गांधींबाबत प्रतिमा जाळणे वगैरे केलेल्या कृतींवर प्रभूंनी काहीच आक्षेप घेतले नाही, म्हणून ते गोडसेवादी असल्याचा युक्तिवाद प्रभू मात्र फेटाळून लावतात. आश्रम प्रतिष्ठान हे कोणी व्यक्त केलेल्या मतांवर प्रतिक्रिया देण्यासाठी नाही, हे प्रार्थना स्थळ आहे. यात माझ्या कृतीने कुठेही बाधा आली नाही. असेल तर ते कुणी सांगावे. मला ज्या सभेने बरखास्त केल्याचे सांगितले जाते, त्यातील सदस्य हे केवळ निमंत्रित आहे. त्यांना मतदानाचा अधिकार नाही. डॉ. सुगण बरंठ, राधाबेन भट, के. नटराजन, असे ज्येष्ठतम गांधीवादी मला कार्यभार सांभाळण्याचा सल्ला देतात. त्यांना प्रतिष्ठानची नियमावली माहीत आहे. म्हणून मी कार्यरत राहणार असल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले आहे. महादेव विद्रोही यांनी मात्र याबाबत पुढील सभेत निर्णय लागेल, असे नमूद करीत अधिक भाष्य टाळले.