News Flash

नवे नेतृत्व उभे करून निवडणुकीत संघर्ष करू – पवार

‘काळ्याआई’शी बेईमानी करणाऱ्या जातीयवादी भाजप-शिवसेनेला मतदारांनी ‘चलेजाव’ करावे

(संग्रहित छायाचित्र)

राज्यात नवे नेतृत्व निर्माण करुन निवडणुकीत संघर्ष करूच मात्र सत्तेसाठी पक्ष सोडून गेलेल्यांचाही निवडणुकीत बंदोबस्त करू, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पक्षातील पडझडीचे आव्हान स्वीकारले. ‘काळ्याआई’शी बेईमानी करणाऱ्या जातीयवादी भाजप-शिवसेनेला मतदारांनी ‘चलेजाव’ करावे, असे आवाहनही पवार यांनी नगरमध्ये बोलताना केले.

खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी नगरमध्ये पक्षाच्या मेळाव्यास विधानसभेचे माजी अध्यक्ष आ. दिलीप वळसे, आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, आ. राहुल जगताप, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख उपस्थित होते.

यावेळी पिचड विरोधक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, भाजप नेते अशोक भांगरे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर भाजपचे जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे हे सोमवारी (दि. २३) राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

पवार म्हणाले, राज्यात काही ठिकाणी पूर आला, काही ठिकाणी दुष्काळ आहे, परंतु केंद्र व राज्य सरकारने काय मदत केली? शेतकरी आत्महत्या करत आहेत, कारखाने बंद पडत आहेत, बेरोजगारी वाढत आहे, परंतु  केंद्र व राज्य जबाबदारी झटकत आहे.  शेतकऱ्यांचे वाटोळे होत आहे, मात्र त्याकडे लक्ष न देता, जबाबदारी पेलवत नसल्याने महाजनादेश यात्रा काढून गावभर मुख्यमंत्री फिरत आहेत.

पंतप्रधानांनी काय दिवे लावले?

पवार म्हणाले. मोदी राज्यात आले मात्र स्वत: काय दिवे लावले, हे सांगण्याऐवजी पवार, पवार करत बसले.  राज्यातील दुष्काळ, महापूर, शेतीचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या याबद्दल काही बोलले नाहीत.  पाकिस्तानबाबतच्या माझ्या वक्तव्याची माहिती घेऊन नंतरच त्यांनी आरोप करायला हवे होते. माझ्यावर आरोप करताना पंतप्रधानांनी खबरदारी घ्यावी, मी त्यांच्याविरुद्ध बोलून पंतप्रधान पदाची अप्रतिष्ठा करणार नाही.

गड किल्ल्यांवर छमछम

राज्यातील गडकिल्ले हॉटेल, बारसाठी खुले करण्याच्या निर्णयावर शरद पवार यांनी टीका केली. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी मावळ्यांनी पडेल ती किंमत मोजली, परंतु जेथे तलवारी तळपल्या तेथे आता छमछम चालणार आहे. आमच्या आर. आर. पाटलांनी मुंबईतील बंद केलेले डान्सबार यांनी पुन्हा सुरू केले.

आचारसंहितेमुळे विश्रामगृह सोडले

खा. शरद पवार औरंगाबादहून नगरला आले. सभेसाठी काहीसा वेळ असल्याने ते पाटबंधारे विभागाच्या सरकारी विश्रामगृहात थांबले. आचारसंहिता लागू होताच पवार यांनी लगेच सरकारी विश्रामगृह सोडले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी नगरमध्ये पक्षाचा मेळावा झाला. यावेळी पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आ. संग्राम जगताप, माजी महापौर अभिषेक कळमकर आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2019 2:01 am

Web Title: struggle in the elections by building a new leadership says shard pawar abn 97
Next Stories
1 महायुती झाली तर 205, न झाल्यास भाजपा 144 शिवसेना 39 जागा; एबीपी माझा सी व्होटर्सचा सर्व्हे
2 निवडणूक निकालानंतर राज्यात आघाडी सरकार येईल : बाळासाहेब थोरात
3 जातीयवाद निर्माण करणाऱ्या भाजपाला चले जाव म्हणा: शरद पवार
Just Now!
X