बिकट परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना नाना पाटेकर यांचे धीराचे बोल
आयुष्यात अनेक अडचणींचे प्रसंग येतात. त्यावर आत्महत्या हा उपाय नाहीच. आयुष्याची खरी गंमत झगडण्यातच आहे. छत्रपती शिवरायांनी किती संघर्षांला तोंड दिले होते ते सर्वानी आठवले पाहिजे, अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी बिकट परिस्थितीशी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना शनिवारी धीर दिला.
अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या वतीने लातूर-उस्मानाबाद जिल्हय़ांतील ११३ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत देण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
पाटेकर म्हणाले की, आम्ही देत असलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत, इतकेच आम्हाला सांगायचे आहे. मदत देऊन पंगु बनवण्याची अजिबात इच्छा नाही. आत्महत्या करणे हा गुन्हा आहे. कुराणामध्ये यासंबंधी स्पष्ट उपदेश असल्यामुळे मुस्लिम समाजात आत्महत्येचे प्रमाण कमी आहे, असे सांगून आत्महत्या करून देवाशी प्रतारणा करू नका, असे आवाहन त्यांनी केले. भीषण दुष्काळाचे सावट असताना नेत्यांनी उणीदुणी न काढता एकत्र दौरे काढून संकटावर मात केली पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
बेडकाच्या अंगावर पाय पडला तरी तो जीव वाचवण्यास उसळी मारतो. आज तिशीतील तरुण आत्महत्या करायला का प्रवृत्त होतो याचा समाजाने विचार करावा, असे मकरंद अनासपुरे यांनी सांगितले. देशात ‘इंडिया’ व ‘भारत’ असे दोन भाग आहेत. शहरी भागांत पाण्याचा बेफिकिरीने वापर होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही आयुष्यात कितीही संपत्ती कमवली तरी सोबत काय नेणार आहोत? शेजारच्या माणसाचा भुकेचा आक्रोश आपल्याला कळत नसेल तर आपण माणूस म्हणून जगण्यास लायक आहोत का, याचा विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले. शिकलेल्याला सुशिक्षित करणे ही समाजासमोरील आजची खरी समस्या आहे. आमची चळवळ राजकीय नसून माणुसकीची आहे. एक संस्था काढून शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना यापुढेही मदत केली जाईल, असे अनासपुरे म्हणाले.
जिल्हाधिकारी पोले यांनी शेतकऱ्यांनी पीकपद्धती बदलण्याची गरज व्यक्त केली. पाण्याचा जुगार खेळणे बंद करून उसासारखे अतिपाणी लागणारे पीक घेणे बंद केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.