शिकवणीवर्गातून घरी परतणाऱ्या आठवीतील विद्यार्थ्यांस उचलून चारचाकी वाहनातून अपहरण करण्यात आले. हा प्रकार प्रत्यक्ष पाहणाऱ्याने पोलिसांना कळविताच पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करून तासाभरात चारपकी दोन आरोपींना जेरबंद केले, तर दोघे फरारी झाले. तिसऱ्या आरोपीला शनिवारी अटक करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. अतीफ शेख (२७) असे शनिवारी अटक केलेल्याचे नाव आहे. खंडणीसाठी हे अपहरण नाटय़ रचल्यात आल्याचे सांगण्यात आले.
विशालनगर परिसरातील कापड व्यापारी जिनेन गांगर यांचा १३ वर्षीय मुलगा इयत्ता आठवीत शिकतो. शुक्रवारी सायंकाळी तो शिकवणी वर्गावरून घराकडे येत होता. वाटेत अनोळखी चौघांनी त्याला उचलून स्विफ्ट डिझायर मोटारीत बसवले. या वेळी मुलाने आरडाओरड केली. प्रत्यक्षदर्शीना हा काय प्रकार आहे, हे कळण्याआधीच मोटार भरधाव निघून गेली. पत्रकार पांडुरंग कोळगे यांनी तातडीने पोलीस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांना माहिती दिली. पोलिसांनी शहराच्या चारी बाजूंना नाकाबंदी केली. अंबाजोगाई रस्त्यावर आरोपींच्या गाडीने समोरच्या गाडीला धक्का दिला. यानंतर बर्दापूर पोलिसांनी त्यांना अडवले, तेव्हा दोघे आरोपी पसार झाले. दोघांना पोलिसांनी पकडले व गाडीतील मुलाची सुटका केली.
शहरातील भक्तीनगर भागात राहणारा अस्लम अकबरखाँ पठाण (वय ३०) याने मुलाचे अपहरण करून ५० लाखांची खंडणी मागण्याचा कट आखला होता. अंबाजोगाई तालुक्यातील जवळगाव येथील उमाशंकर सोमनाथ स्वामी (वय २६), तसेच अन्य दोघांना त्याने बोलावून घेतले होते. ठरल्याप्रमाणे मुलाचे अपहरण केले. मात्र, पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे आरोपी तासाभरात पकडले गेले.