कर्मचाऱ्यांनी थट्टा केल्याने संतप्त मुली आक्रमक

शहरातील नाईकनगर भागातील शासकीय वसतिगृहातील अडचणी व समस्या मांडण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात गेलेल्या विद्यार्थिनींची याच कार्यालयात कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी थट्टा केल्याची घटना शनिवारी घडली. येथील कर्मचाऱ्यांनी थट्टा केल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थिनींनी कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन केले.

राज्य शासनाच्या वतीने शहरातील नाईकनगर परिसरात आर्थिकदृष्टय़ा दुर्बल व मागसवर्गीय मुलींसाठीचे वसतिगृह चालवले जाते. या वसतिगृहातील विद्यार्थिनींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याविषयी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी आपल्या समस्या वसतिगृहातील गृहपाल यांना सांगितल्या; परंतु त्यावर उपाययोजना करण्याऐवजी उलट विद्यार्थिनींनाच वसतिगृहातून हाकलून देण्याचा दम येथे गृहपाल असलेल्या महिला कर्मचाऱ्याकडून देण्यात आला. वसतिगृहातील विद्यार्थिनी आपल्या विषयीची तक्रार करणार असल्याची माहिती येथे गृहपाल व मुख्य कार्यालयात लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचारी महिलेला मिळाली. शनिवारी विद्यार्थिनी मुख्य कार्यालयात येण्याअगोदरच महिला कर्मचारी येथे पोहोचल्या. त्यापाठोपाठ शासकीय वसतिगृहातील विद्यार्थिनी समाजकल्याण विभागाच्या शहराबाहेर असलेल्या सामाजिक न्याय भवनाच्या कार्यालयात पोहोचल्या. यानंतर या कार्यालयातील सहायक आयुक्त कार्यालयीन कामानिमित्त बाहेर असल्याने त्या गृहपाल महिलेने व येथील कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने विद्यार्थिनींची थट्टा करत त्यांच्या हातातील निवेदन घेतले व तेथून जाण्यास सांगितले. संतापलेल्या या विद्यार्थिनींनी सहायक आयुक्त कार्यालयाच्या मुख्य दरवाजासमोर घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले.

या निवेदनावर माहेश्वरी मुधळकर, निशा बिचकेवार, स्नेहा बंडे, पूजा जोगदंड, दीक्षा भगत, सुजाता गव्हारे, निकिता कोंडामंगल, प्रेरणा गजभारे, निकिता पवार, संबोधी धनजकर, पूजा जवळगेकर यांच्यासह ६७ विद्यार्थिनींच्या सहय़ा आहेत.

वसतिगृहांविषयी तक्रारींचा पाढा

काही माध्यमांचे प्रतिनिधी घटनास्थळी गेले असता, त्यांनी वसतिगृहात देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा पाढाच वाचला. यामध्ये विद्यार्थिनींनी सकाळी देण्यात येणारा आहार काहीअंशी देण्यात येतो, जेवणामध्ये काही वेळेस अळय़ा निघतात, पिण्यासाठी पाणी नाही, वसतिगृहात कायमचीच ओल असते, यासह देण्यात येणारी फळे निकृष्ट दर्जाची असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व बाबी आम्ही भ्रमणध्वनीमध्ये कैद केल्या आहेत. या सर्व बाबींची माहिती गृहपालांना मिळाल्याने त्यांनी आमचे भ्रमणध्वनी जप्त केले असल्याचा आरोप या वेळी केला. यानंतर समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त बी. एन. वीर यांची भेट घेत त्यांच्याकडे वसतिगृहातील अनेक असुविधेच्या तक्रारींचा पाढाच वाचला व आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना दिले.