कॉपी करताना पकडल्याने कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारणाऱ्या सचिन वाघ या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सचिन वाघ औरंगाबादमध्ये बीएससी नर्सिंगमध्ये शिकत होता. आत्महत्या करण्यापूर्वी सचिनने आपला मित्र शुभम राठोडला फोन केला होता. यावेळी त्याने आपल्या मित्राला कॉपी पकडली असून सहा महिन्यांचा बॅक लावला असल्या कारणाने आपण आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. त्याचा मित्र त्याला थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता, पण सचिन ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता. ‘सॉरी भावा…बाय बरं का…घरच्यांना सांग’ हे सचिनचे शेवटचे शब्द होते.

एम. आय.टी या कॉलेजमध्ये बीएससी नर्सिंगमध्ये सचिन वाघ हा शिकत होता. सचिनचे वडील एसटीत चालक आहेत. मंगळवारी कॉलेजमध्ये परीक्षा होती. सचिनचा न्यूट्रीशन बायोकेमेस्ट्रीचा पेपर होता. सकाळी दहाच्या सुमारास परीक्षा सुरु असताना सचिनला कॉपी करताना पकडण्यात आले. यानंतर प्राचार्यांनी त्याच्या वडीलांना फोन लावला. मात्र लागला नाही. त्याला परीक्षेला बसू न दिल्याने तो बराचवेळ गॅलरीत बसून राहिला. गॅलरीत कोणी नाही हे पाहिल्यानंतर त त्यानं खिडकीत जाऊन उडी मारली. यात गंभीर जखमी झालेल्या सचिनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. बुधवारी पहाटे सचिनचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

सुरुवातीला सचिनला फी भरु न दिल्याने परीक्षेत बसू दिले नाही, अशी चर्चा सुरु होती. मात्र, कॉलेज प्रशासनाने सचिनने पूर्ण फी भरली होती, असे कॉलेज प्रशासनाचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे काही विद्यार्थी संघटनांचा या घटनेवरुन राजकारण करण्याचा प्रयत्न देखील आहे.