नापिकीमुळे वडिलांची परिस्थिती हलाखीची झाल्याने आपल्या शिक्षणाचे शुल्क भरल्यास त्यांच्यावर अधिक बोजा वाढेल, या विवंचनेतून जळगाव तालुक्यातील भादली येथील यामिनी प्रमोद पाटील (१७) या विद्यार्थिनीने आत्महत्या केली.

यामिनी ही जळगाव येथील नंदिनीबाई महिला विद्यालयात इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. यंदा पहिल्या  सत्रात महाविद्यालय आणि शिकवणीसाठी बरेच पैसे खर्च झाले होते. त्यात सततच्या पावसामुळे घरच्या शेतीतून फार उत्पन्न मिळण्याची आशा न राहिल्याने आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवित होते. हे सर्व चित्र यामिनी पाहत होती.

शेतीसाठी कर्ज घेवूनही हाती काही आले नाही. त्यामुळे डोक्याला हात लावून बसलेल्या वडिलांनी काही विपरीत करायला नको, या विचारातून यामिनीने स्वत:च आत्महत्या केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

आई-वडील लग्न सोहळ्यासाठी भुसावळ येथे गेले होते.  घरात कोणी नसल्याने दुपारी  यामिनीने विष प्राशन केले. आई-वडील घरी पोचले तेव्हां अस्वस्थ यामिनीने आपण ‘थायमेट’ हे विषारी औषध घेतल्याचे सांगितले. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात  नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.