सैन्य दलात अधिकारी होण्यासाठी प्रशिक्षण संस्थेत प्रवेशाचा हट्ट धरण्याऱ्या मुलीस बेताची आर्थिक परिस्थिती असल्याने वडिलांकडून नकार मिळाल्याने निराश झालेल्या विद्यार्थिनीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी गेवराई तालुक्यातील काळेगाव येथे घडली. दरम्यान, मुलीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना पोलिसांनी वाहन अडवले तर रुग्णालयातही तिच्यावर वेळेवर उपचार झाले नाही, त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप वडिलांनी केला आहे.

बीड जिल्ह्यतील कोळगाव येथील सारिका दादासाहेब शिंदे (वय १८) या बारावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने शनिवारी सकाळी विष प्राशन केले. तिच्यावर गेवराई येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर तातडीने बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र कर्मचाऱ्यांमार्फत कळवूनही तब्बल तासभर एकही वैद्यकीय अधिकारी न आल्याने सारिका शिंदे हिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला. सारिका शिंदे ही बारावीच्या वर्गात विज्ञान शाखेत शिकत होती. सैन्य दलात भरती होऊन मोठे अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न होते. तिने वडिलांकडे अहमदनगर येथील सनिकी प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी आग्रह धरला होता. मात्र, प्रवेश घेण्यासाठी पैसे लागतात आणि या वर्षी शेतात काहीच पिकले नाही. त्यामुळे सध्या त्यांनी प्रवेशास नकार दिला.

सैन्य दलात अधिकारी होण्याचे आपले स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही या नराश्यातून सारिका हिने शनिवारी सकाळी विष प्राशन केले होते. दरम्यान, गेवराईकडून बीडकडे येण्यासाठी रुग्णवाहिका नसल्याने खासगी वाहनातून सारिकाला आणण्यात आले होते. मात्र, बीड शहरातील अण्णा भाऊ साठे चौकात वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहन रोखले. सात ते आठ मिनिटे गाडीची तपासणी केली.

या वेळी विनवणी करूनही त्यांनी वाहन सोडले नाही. रुग्णालयात गेल्यानंतर तिथेही वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी तिला वेळेवर उपचार मिळाले नाहीत, त्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप सारिकाचे वडील दादासाहेब शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या घटनेची दखल घेत अपर पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहेत.