उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कुलगुरूंच्या बैठकीत निर्णय
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षांनिमित्त येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे फेब्रुवारीमध्ये समता विद्यार्थी प्रबोधन संमेलनातील ठरावांच्या अंमलबजावणीविषयी चर्चेसाठी जूनमध्ये महाराष्ट्रातील विविध विद्यार्थी संघटनांचे राज्यस्तरीय संमेलन आयोजित करण्याचा निर्णय रविवारी घेण्यात आला.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात कृषी व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू, त्यांचे प्रतिनिधी यांची बैठक कुलगुरू प्रा. सुधीर मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त विद्यापीठांनी विविध उपक्रम एकत्रितरीत्या करण्याबाबत चर्चा झाली. फेब्रुवारीत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने समता विद्यार्थी प्रबोधन संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनातील ठरावांवार बैठकीत चर्चा झाली.
यापैकी काही ठरावांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासंदर्भात महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी संघटनांचे एकत्रित संमेलन घेण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी सर्व विद्यापीठांचे सहकार्य घेतले जाणार आहे. या ठरावांना सहमती दर्शविण्यासाठी सर्व विद्यापीठांनी आपल्या स्तरावर शासनाकडे पत्र पाठविण्याची सूचना या वेळी करण्यात आली. या वेळी डॉ. आंबेडकर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षांनिमित्त विविध विद्यापीठांमध्ये आयोजित कार्यक्रमांची माहिती देण्यात आली.
क्षयरोगमुक्त भारत मोहिमेसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने राज्यस्तरावर पुढाकार घेतला असून जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने मुंबई येथे पश्चिम विभागातील कुलगुरूंची बैठक घेण्याचा निर्णय बैठकीत झाला. यशदाच्या धर्तीवर मुंबईत महाराष्ट्र विद्यापीठ प्रशासकीय प्रबोधिनी स्थापन करण्याविषयी राज्य शासनाकडे आग्रह धरण्याविषयीही चर्चा करण्यात आली. बैठकीस मेश्राम यांसह मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सिद्धार्थ काणे तसेच विद्यापीठांचे कुलसचिव, परीक्षा नियंत्रक आदी उपस्थित होते.