वळणावर वाहन पलटी झाल्याने १३ विद्यार्थी जखमी

विक्रमगड तालुक्यातील औंदे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेसाठी नेणारे वाहन गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास एका अवघड वळणावर पलटल्याने १३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. मॅझिक पिकअप प्रकारातील या वाहनामध्ये १८ विद्यार्थी, एक शिक्षिका आणि शाळेचे मुख्याध्यापक अजित भोये होते. भोये स्वत: वाहन चालत होते.

विक्रमगडमधील यशवंतनगर येथे हे विद्यार्थी जात होते. औंदा येथील पुलावर वाहन आले असता अवघड वळणावर हे वाहन पलटल्या हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या १८ विद्यार्थ्यांना विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी पाच विद्यार्थ्यांच्या हाताला व डोक्याला मार लागल्याने त्यांना ठाणे जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान, या प्रकरणी विक्रमगड पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी भगवान मोकाशी यांनी ओंदे जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना नोटीस देणार असल्याचे सांगितले. प्रवासात विद्यार्थ्यांनी योग्य ती दक्षता न घेतल्याच्या मुद्यावर त्यांनी बोट ठेवले असून या प्रकरणी चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ओंदे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धे साठी यशवंतनगर येथे घेऊन जात असताना ओंदे पुलासमोर रस्त्यावर गाडी वळवताना पलटी झाली. हे वाहन मी स्वत: चालवत होतो. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढून तत्काल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. – अजित भोये, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, ओंदे

या अपघाताची माहिती मिळताच विक्रमगड रुग्णालयात जाऊन पाहणी केली. अशा प्रकारे अपघातांच्या घटना होऊ नये यासाठी विक्रमगड तालुक्यातील प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना विद्यर्थ्यांची प्रवासात दक्षता घेण्याची नोटिस बजावण्यात येणार आहे. – भगवान वि. मोकाशी, गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती, विक्रमगड