आभाळच फाटलंय, तर ठिगळ कुठे लावायचे असे म्हणतात. रायगड जिल्हय़ातील कोळघर येथील आदिवासी आश्रमशाळेला भेट दिल्यावर याचा प्रत्यय येतो. असुविधा, अस्वच्छता आणि असुरक्षिततेच्या गत्रेत गेली अनेक वर्षे या आश्रमशाळेतील ५५०  विद्यार्थी नरकयातना भोगत आहेत.
 समाजातील दुर्बल, आदिवासी घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन विविध उपाययोजना आखते; परंतु त्याची योग्य अंमलबजावणी होत नाही याचे मूर्तिमत उदाहरण म्हणजे कोळघर येथील आदिवासी आश्रमशाळा. अत्याधुनिक तर सोडाच, पण येथील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाही शासनाने योग्य पद्धतीने पुरविलेल्या नाहीत.  १९७२ मध्ये सुरू झालेल्या आश्रमशाळेत अलिबाग, पेण, रोहा परिसरांतील ५५० हून अधिक आदिवासी मुले-मुली निवासी शिक्षण घेत आहेत. येथे मुलांना पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते; पण ही मुले आज ज्या वातावरणात शिक्षण घेत आहेत ते पाहिल्यावर याला विकास म्हणायचा का, असा प्रश्न निर्माण होतो. ज्या खोलीत राहायचं त्याच खोलीत शिकायचं, तेथेच कपडे वाळत घालायचे, तेथेच जेवायचे, तेथेच अभ्यास करायचा आणि तेथेच झोपायचे. बसायला धड जागा नाही, इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही अशा अवस्थेत जीव मुठीत घेऊन जीवन जगण्याची वेळ येथील विद्यार्थ्यांवर आली आहे.
     महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वीच्या शेतीशाळेच्या इमारतीत किरकोळ बदल करून ही आश्रमशाळा सुरू करण्यात आली, जी आज बिकट अवस्थेत आहे. शाळेच्या अनेक वर्गखोल्यांचा पाया खचला आहे. खोल्यांच्या छपरांतून पाणी गळत असते. िभती आतून ओल्या झाल्या आहेत. खिडक्यांना झडपा नसल्याने पावसाचे पाणी आत येते. स्वयंपाकघरातील सांडपाणी शाळेच्या बाजूलाच वाहत असते. खोल्यांमध्ये कुबट वातावरण निर्माण होऊन या सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
   साधारणपणे मुलांची राहण्याची आणि निवासाची स्वतंत्र व्यवस्था असणे अपेक्षित असते, मात्र इथे शिक्षणासाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध नाही. आश्रमशाळेत दीडशेहून अधिक मुली आहेत. त्यांच्याकरिता न्हाणीघर तसेच शौचालयांची व्यवस्था आहे. मात्र मुलांसाठी आंघोळ किंवा शौचालयाची व्यवस्थाच नाही. गेली ४० वष्रे येथे शिकणारी मुले त्यासाठी जवळच्या नदीवर जातात. गेल्या ४० वर्षांत या मूलभूत सुविधादेखील शासनाने पुरविल्या नाहीत. मुलांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळत नाही. आदिवासी विकास विभागाने लाखो रुपये खर्चून दोन वर्षांपूर्वी शाळेकरिता चार सौरबंब पुरवले, मात्र त्याचा एकदाही वापर झाला नाही. खेळाचे साहित्यही तुटलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे असुविधा आणि असुरक्षिततेच्या वातावरणात शाळेतील विद्यार्थ्यांना वास्तव्य करावे लागत आहे. शासनाने आश्रमशाळांच्या इमारती नव्याने बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत कोळघर आश्रमशाळेची इमारत बांधण्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे. मात्र निधीअभावी रखडलेले हे काम आता पुन्हा सुरू झाले असून विद्यार्थी ते पूर्ण व्हायच्या प्रतीक्षेत आहेत. कोळघर आदिवासी आश्रमशाळा हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. जिल्हय़ातील इतर आदिवासी शाळांचीही परिस्थिती फारशी चांगली नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्हय़ातील आश्रमशाळांच्या विकासासाठी व्यापक प्रयत्न होणे गरजेचे आहे.
हर्षद कशाळकर , अलिबाग