उच्च शिक्षण व स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी नवी दिल्लीत महाराष्ट्रातील सुमारे पंधराशेहून अधिक विद्यार्थी टाळेबंदीमुळे अडकून आहेत. त्यांना राज्यात परत आणण्याच्या प्रयत्नांना यश आले असून, उद्या (शनिवार) ते राजधानीतून निघणार असल्याचे  सांगण्यात आले आहे. खासदार संजय मंडलिक यांनी याबाबत माहिती दिली.

दिल्ली येथील राजेंद्रनगर, करोलबाग, हैदरपूर अशा करोना संवेदनशील भागामध्ये उच्च शिक्षण व स्पर्धा परिक्षांच्या तयारी निमित्त महाराष्ट्रातील सुमारे पंधराशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे शंभर विद्यार्थी टाळेबंदीमुळे तेथे अडकून पडलेले आहेत. करोनाच्या लॉकडाउनच्या पार्श्वभुमीवर त्यांचे शिकवणी वर्ग व खानावळी बंद असल्याने विद्यार्थ्यांसमोरील अडचणी वाढतच आहेत.

राजस्थाननंतर राजधानीतील मार्ग सुकर –

दरम्यान, राजस्थान येथील कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सुखरुप परत आणण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्याच धर्तीवर दिल्ली येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांनाही घरी परतण्याकरीता मदत करावी, अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेकडे केली होती. यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी रेल्वेची खास सोय करुन या विद्यार्थ्यांचा घरी परतण्याचा मार्ग सोपा केला आहे. दिल्लीहून उद्या (शनिवार) संध्याकाळी ४ वाजता रेल्वे निघणार असून ती पुण्यामध्ये परवा दिवशी (रविवार) संध्याकाळी ४ वाजता पोहचणार असल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी दिली. त्यांच्या प्रवासादरम्यान जेवण, नाश्ता,पाणी संचाची सोय सेवाभावी संस्थांनी केली आहे. पुणे येथे पोहचल्यानंतर या विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर त्यांच्या जिल्ह्यात जाण्याची सोय केली आहे, असे मंडलिक यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथे सांगितले.