दहावी, बारावी बरोबरच जेईईच्या सुटीतील वर्गाना सध्या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची गर्दी झाली आहे. उन्हाळ्याच्या सुटीत पुण्यात येऊन एखादी शिकवणी, नवा कोर्स करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल दिसून येत आहे.
अगदी वैदिक गणितापासून ते जेईईच्या अभ्यासापर्यंत अनेक विषयांच्या उन्हाळ्याच्या सुटीपुरत्या हंगामी शिकवण्या घेतल्या जातात. अनेक बँड्रेड क्लासेसही सुटीतील वर्गाचे आयोजन करत असतात. सध्या पुण्यात सुरू झालेल्या या हंगामी शिकवण्यांना बाहेरगावचे विद्यार्थी गर्दी करत आहेत. क्लासच्या मोठय़ा नावामुळे आवर्जून काही क्लासमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी प्रयत्न करत आहेत. नववीची परीक्षा संपली की दहावीच्या अभ्यासक्रमाचे सुटीतील वर्ग, अकरावी झाली की जेईईच्या तयारीसाठीचे वर्ग यांना विद्यार्थ्यांकडून प्राधान्य मिळत आहे. शहरातील बहुतेक ब्रँडेड क्लासेसचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. आपल्या गावामध्ये क्लास असतानाही पुण्यात जाऊन शिकणे. फक्त अशा उद्देशाने आलेले विद्यार्थी जास्त दिसत आहेत. दहावी, बारावी, जेईई यांच्याबरोबरच परदेशी भाषा शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही वाढते आहे.
या हंगामी शिकवण्यांची एक स्वतंत्र बाजारपेठच तयार झाली आहे. या हंगामी वर्गासाठी क्लासेसकडून स्वतंत्र प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. एक किंवा दीड महिन्याच्या कालावधीमध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमाची प्राथमिक तयारी या वर्गामध्ये करून घेतली जाते. त्यासाठी नंतर ब्रँडेड क्लासेसकडून त्यांच्या नियमित शिक्षकांबरोबरच काही नामवंतांच्या मार्गदर्शन वर्गाचेही आयोजन करण्यात येते. जेईईच्या सुटीतील वर्गाचे शुल्क हे साधारणपणे पाच हजार रुपयांपासून सुरू होते, ते अगदी पंचवीस हजार रुपयांपर्यंत जाऊन भिडल्याचे दिसते आहे. एक महिना राहायचे म्हटल्यावर वसतिगृह, खानावळ हे ओघाने आलेच. वर्षभर वसतिगृहांमध्ये राहणारे विद्यार्थी हे सुटीसाठी घरी जातात. त्यानंतर रिकामी होणारी जागा ही हंगामी शिकवण्या करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाते. काही क्लासेसनीच वसतिगृहाची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. नगर, नाशिक, सोलापूर आणि कोकण या भागातील विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त असल्याचे निरीक्षण क्लासचालकांनी नोंदवले आहे.