दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठे येथे एका शाळेत लोहयुक्त गोळ्या खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटी-जुलाबाचा त्रास होऊ लागल्याचा प्रकार उघडकीस आला. हा त्रास होऊ लागल्याने ५९ विद्यार्थ्यांना नजीकच्या मंद्रूप प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सुदैवाने सर्वाची प्रकृती सुधारल्यामुळे सर्वाना नंतर घरी सोडण्यात आले.
माळकवठे येथे श्री पंचाक्षरी विद्यालय ही खासगी शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली असता बऱ्याचणांच्या शरीरात लोह कमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे गुरुवारी सकाळी या विद्यार्थ्यांना लोहयुक्त गोळ्या देण्यात आल्या. या गोळ्यांचे सेवन केल्यानंतर सहावीच्या विद्यार्थ्यांच्या पोटात मळमळ होऊन थोडय़ाच वेळात उलटी-जुलाबाचा त्रास सुरू झाला. शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी गावक ऱ्यांच्या मदतीने सर्व बाधित विद्यार्थ्यांना मंद्रूप येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील औषधोपचारानंतर सर्वाच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली. त्यामुळे दुपारी उशिरा सर्वाना घरी पाठविण्यात आले. मंद्रूप पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.