अहवालातून बाब उघड, शिक्षण तज्ज्ञांना चिंता

मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातील खासगी आणि सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचे उघडकीस आले आहे. २०१४-१५ च्या तुलनेत २०१७-१८ या वर्षांत विद्यार्थी संख्येत तब्बल एक लाख ५३ हजार १५ ने घट झाली असून याबाबत शिक्षण तज्ज्ञही चिंतित आहेत. लोकसंख्यावाढीच्या जननदरातील घसरण त्याला कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे.

लोकसंख्यावाढीच्या जननदरात २००७-०८ च्या तुलनेत २०१७ मध्ये घट झाल्याचे आढळले आहे. २००७-०८ मध्ये जननदर ३२.०७ टक्के होतो. तो २०१७ मध्ये २७.७८ टक्क्यांवर आला. यात सुमारे ४.२९ टक्क्यांनी घट झाली. त्याचा परिणाम खासगी आणि सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येवर झाल्याचे एका अहवालातून उघडकीस आले आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या २०१४-१५ मध्ये एक कोटी ९८ लाख ३७ हजार ४७८ इतकी होती. २०१७-१८ मध्ये ती एक कोटी ९६ लाख ८४ हजार ४६४ इतकी झाली. २०१४-१५ च्या तुलनेत २०१७-१८ मध्ये विद्यार्थी संख्येत एक लाख ५३ हजार १५ ने घट झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

गेल्या पाच वर्षांमध्ये पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत ९ टक्क्यांनी घट झाल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे. २०१४-१५ मध्ये पालिका शाळांमध्ये ३ लाख ९१ हजार ७७२ विद्यार्थी शिक्षण घेत होते. २०१८-१९ मध्ये पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या २ लाख ७१ हजार २१८ इतकी झाली. सतत गैरहजर राहिल्यामुळे ५५ हजार ९८२ विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईमधील खासगीसह एकूण शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या २०११-१२ मध्ये १४ लाख ७१ हजार ८९० इतकी होती. त्यात २०१८-१९ मध्ये ४५.८६ टक्क्यांनी म्हणजे तब्बल सात लाख ९६ हजार ८१४ इतकी घट झाली आहे. खासगी शाळांच्या तुलनेत पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत झालेली घट ही कमी असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

’ २०१४-१५ मध्ये विद्यार्थी संख्या एक कोटी ९८ लाख ३७ हजार ४७८ 

’ २०१७-१८ मधील विद्यार्थी संख्या एक कोटी ९६ लाख ८४ हजार ४६४