नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ातील एटापल्ली, धानोरा, आलापल्ली, भामरागड, सिरोंचा या पाच तालुक्यातील बंद केलेल्या मॉडेल स्कूल पूर्ववत सुरू कराव्या, या मागणीसाठी पालकमंत्री राजे अंबरीशराव आत्राम यांच्या अहेरी येथील राजमहालासमोर शेकडो विद्यार्थी व पालकांनी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. नक्षलग्रस्त भागात केंद्र व राज्य सरकारचा निषेध नोंदवित विद्यार्थ्यांनी प्रथमच एल्गार पुकारल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
केंद्र सरकारने राज्यातील ४३ मॉडेल स्कूल बंद केल्या आहेत. यात राज्यातील सर्वाधिक दुर्लक्षित गडचिरोली जिल्ह्य़ातील एटापल्ली, धानोरा, आलापल्ली, भामरागड व सिरोंचा या पाच तालुक्यातील पाच मॉडल स्कूलचा समावेश आहेत. यामुळे ४५० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंध:कारमय झाले आहे. या शाळा पूर्ववत सुरू कराव्या, या मागणीसाठी विद्यार्थी व पालकांचा लढा सुरू आहे, परंतु पालकमंत्री अंबरीशराव आत्राम यांचे याकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे, तर खासदार अशोक नेते व इतर दोन आमदारांना या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्याची सवडच नाही. एकूणच राज्य व केंद्रात भाजपची सत्ता येताच या जिल्ह्य़ाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचाच परिणाम आज विद्यार्थ्यांच्या मागण्यांनाही केराची टोपली दाखविली जात आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मॉडेल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी थेट पालकमंत्र्यांच्या राजमहालासमोर सकाळपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले आहे. भाजप सरकारचा पदोपदी निषेध नोंदवितांनाच पालकमंत्री आत्राम व खासदार अशोक नेते यांचाही येथे जाहीर निषेध नोंदविण्यात येत आहे. मॉडेल स्कूल सुरू करा अन्यथा, आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. आठवी व नववीतील ही चिमुकली आदिवासी मुले उपाशीपोटी पालकमंत्र्यांच्या राजवाडय़ासमोर बसली असतांना त्यांचे उपोषण दडपण्यासाठी अधिकारी व पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. तिकडे पालकमंत्री आज जिल्ह्य़ात असतांनाही त्यांनी या विद्यार्थ्यांची भेटही घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थी चांगलेच संतापले असून, मॉडेल स्कूलला परवानगी मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.