शहरातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून कनिष्ठ विद्यार्थ्यांची रॅगिंग करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात दिल्लीतील अ‍ॅण्टी रॅगिंग हेल्पलाइनकडून विचारणा करण्यात आल्यावर महाविद्यालयाने पडताळणी केल्यानंतर पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. महाविद्यालयात यापूर्वीही रॅगिंगच्या घटना घडल्या आहेत. महाविद्यालयासमोर असलेल्या वसतिगृहात वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारे रॅगिंग करण्यात येत असल्याने कनिष्ठ विद्यार्थी प्रचंड मानसिक दबावात असल्याची तक्रार पीडित विद्यार्थ्यांच्या एका नातलगाने दिल्लीस्थित अ‍ॅण्टी रॅगिंग हेल्पलाइनकडे केली. या तक्रारीची तत्काळ दखल घेत महाविद्यालयास कळविण्यात आल्यावर महाविद्यालयाच्या अ‍ॅण्टी रॅगिंग समितीकडून वसतिगृहातील विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात आली. नवीन विद्यार्थ्यांकडूनही माहिती घेण्यात आली. चौकशीत तथ्य आढळून आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. परंतु विद्यार्थ्यांकडून रॅगिंग करणाऱ्यांची नावे मिळू शकली नाहीत, अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. एस. गुप्ता यांनी दिली. प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे यांनी फिर्याद नोंदवली असून १ ते १० सप्टेंबर या कालावधीत वसतिगृहात रॅगिंग झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. शहर पोलिसांनी अनोळखी विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.