13 December 2019

News Flash

विद्यार्थ्यांना सूर्यमालेचे ‘थ्रीडी’ दर्शन

जिल्हा परिषद शालेय शिक्षणात नवतंत्राचा उपयोग

(संग्रहित छायाचित्र)

चहुबाजूंनी डोंगररांगा चिकू, फणस, नारळीच्या बागाने नटलेल्या निसर्गाच्या सान्निध्यात असलेली शंकरपाडा शाळा, विद्यार्थ्यांना नवनवीन उपक्रमातून अध्ययन अनुभव देण्यासाठी प्रयत्नशील असते. काही दिवसांपूर्वी नासाच्या रोव्हर २०२० बरोबर आपल्या नामखूणा पाठवणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शंकरपाडा शाळेत  प्रत्यक्ष सूर्यमालाच अवतरली ..! आणि विद्यार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव तसेच शिक्षणातील नावीन्याचा आनंद घेता आला.

दैनंदिन अध्यापन प्रक्रियेत इयत्ता पाचवीच्या विज्ञान -परिसर अभ्यास विषयातील आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला हा घटक शिकवताना विजय वाघमारे पाठय़घटक प्रभावी होण्यासाठी एक्सप्लोअरर फॉर मर्ज क्यूब या मोबाइल अ‍ॅपचा कल्पकतेने वापर केला अन् सूर्य, बुध, शुक्र, शनी, पृथ्वी, मंगळ ग्रह  व प्रत्यक्ष वर्गात थ्रीडी सूर्यमालाच विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळाली.

तंत्रज्ञानाचा कल्पकतेने वापर करून विजय वाघमारे यांनी सूर्यमालाच वर्गात आणून दाखवली.  मानवी कक्षेबाहेरील खगोलीय संकल्पना तारे, ग्रह, उपग्रह, धूमकेतू उल्का इत्यादी घटक शिकवताना प्ले-स्टोरवरील विविध शैक्षणिक अ‍ॅपचा वापर करून गरजेनुसार विषय समन्वय साधून तंत्रज्ञानाचा वापर केल्यास विद्यार्थ्यांना खगोलीय संकल्पना समजण्यास मदत होते त्याचा प्रत्यय येथे आला.  आपण ज्या ग्रहावर राहतो तो पृथ्वी ग्रह लाल, तांबूस जेथे आपण नावे पाठवली तो मंगळ ग्रह, कडा असलेला शनी पाहून मुलांची जिज्ञासा आणखीच वाढली, त्यामुळे शिकण्यातला आनंद मुलांनी घेतला.  आनंदाने शिकलेले दीर्घकाळ स्मरणात राहते आणि शिकणे ही प्रक्रियाच आनंददायी होते, असे शाळेचे शिक्षक विजय वाघमारे यांनी सांगितले.

शिक्षकांनी अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे शैक्षणिक वातावरण उत्साहवर्धक होते त्यामुळे विद्यार्थी शाळेत टिकतात व शिकतात, असे मुख्याध्यापक म्हणाले.

सदर शैक्षणिक अ‍ॅपच्या प्रभावी वापराबद्दल गट शिक्षणाधिकारी विष्णू रावते, केंद्र प्रमुख दिलीप जोंधळेकर, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र आहिरे, लहू होळगीर, जयवंत सावळा यांनी कौतुक केले

अ‍ॅपचा वापर

सूर्यमालेचा थ्रीडी अनुभव देण्यासाठी गुगल प्ले-स्टोरवरच्या एक्सप्लोअरर फॉर मर्ज क्यूब  हे अ‍ॅप डाउनलोड करावे लागते. त्यानंतर त्याचा मार्कर इमेज असणारे मर्ज क्यूबची प्रिंट अ‍ॅपवर स्कॅन करून घेतल्यास प्रत्यक्ष सूर्यमालाच पाहायला मिळते, अशी माहिती शिक्षकांकडून देण्यात आली.

First Published on July 20, 2019 12:16 am

Web Title: students solar vision 3d abn 97
Just Now!
X