गुरूवारी मराठा आरक्षण वैध असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला. त्यानंतर आता अकरावीत प्रवेश घेणाऱ्या मराठा आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारने दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, खुल्या प्रवर्गातून ऑनलाइन अर्ज केलेल्या मराठा विद्यार्थ्यांना सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग आणि खुल्या वर्गातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज करण्याची संधी मिळणार आहे.

दरम्यान, या दोन्ही प्रवर्गातील जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने प्रवर्ग बदलण्याची संधी देण्यात आली आहे. सध्या एसईबीसी प्रवर्गात 34 हजार 251 जागांपैकी 4 हजार 557, तर इडब्ल्यूएस प्रवर्गासाठी 28 हजार 636 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या जागांसाठी केवळ 2 हजार 600 अर्ज प्राप्त झाले आहेत. दरम्यान, एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यास, तसेच इडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

अकरावीच्या भाग 1 आणि 2 च्या प्रवेशासाठीही 4 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांचे जात प्रमाणापत्र नसल्यास पालकांचे हमीपत्र स्वीकारण्यात येणार असून ते प्रवेशादरम्यान सादर करावे लागणार आहे. तसेच अकरावीची पहिली गुणवत्ता यादी 12 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे.